जिल्ह्यातील सर्व बसस्थानके आदर्श करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

चंद्रपूर, दि. 14 : ‘चांदा ते बांदा’ असे वर्णन असलेल्या महाराष्ट्रात चांदा कायम प्रथम क्रमांकावर असायला पाहिजे, असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. राज्याचा अर्थमंत्री असताना अनेक ठिकाणी बस स्थानकांसाठी निधी दिला. त्यावेळी 500 बस महाराष्ट्रासाठी मंजूर केल्या. त्यापैकी 200 बसेस फक्त चंद्रपूरसाठी देण्यात आल्या. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यासाठी या बसेस येत आहेत. मुल आगाराची मान्यता आली आहे. चंद्रपूर, मुल बल्लारशाह, पोंभुर्णा येथे आनंददायी बस स्थानके उभारण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व बसस्थानके आता आदर्श करणार आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपूर बसस्थानक, ऑटो-रिक्षा स्टँड तसेच पर्यावरण पूरक ई-बस सेवेचे लोकार्पण करताना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महापालिका आयुक्त विपीन पालिवाल,  राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गबने, चंद्रपूरच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतावणे, विभाग अभियंता ऋषिकेश होले, कार्यकारी अभियंता शितल गोंड, डॉ. मंगेश गुलवाडे, रमेश राजुरकर, ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे, सुभाष कोसनगोट्टूवार, नामदेव डाहुले आदी उपस्थित होते.

‘बाहेरचा पाहुणा चंद्रपुरात येतो आणि जिल्ह्याचे कौतुक करतो. तेव्हा अतिशय आनंद होतो. पण त्यामुळे सेवा अद्ययावत करण्याची आपली जबाबदारी देखील  वाढते. त्यामुळे बस स्थानकांवर पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही लावा. हे सीसीटीव्ही अतिशय उत्तम दर्जाचे असायला हवेत. तसेच येथे प्रवासी समिती तयार करावी. बसस्थानकामध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. ‘लाडकी बहीण सुरक्षित बहीण’ अशी योजना आपण सुरू केली असून एक पोलीस किंवा होमगार्डला एक शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

ऑटोरिक्षा चालकांसाठी स्वस्त दरात घर : राज्यात सर्वात प्रथम ऑटो-रिक्षा चालकांवरील प्रोफेशनल टॅक्स आणि वाहन कर आपण रद्द केल्याचा उल्लेख पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ते म्हणाले, ऑटोरिक्षा चालकांना अतिशय स्वस्त दरात घर देण्याचा निर्णय घेतला आहे. आज बसस्थानक येथे ऑटो-रिक्षा चालकांसाठी स्डँडचे लोकार्पण झाले आहे. खाजगी व छोट्या गाड्यांच्या स्थानकांसाठी सुद्धा शहरात मनपाने जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांना निधी देण्यात येईल.

जिल्ह्यात विविध वास्तुंची उभारणी : चंद्रपूरचा गौरव वाढविणाऱ्या बस स्थानकाचे तसेच ई-बसचे लोकार्पण झाले. जनतेच्या आशीर्वाद्याची शक्ती फार मोठी असते. यासाठीच आपण जिल्ह्यात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात नियोजन भवन, कोषागार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रस्तावित इमारत, न्यायमंदिर, जिल्हा परिषद इमारत, बचत गटांसाठी बाजारहाट, आदी वास्तू चंद्रपूर जिल्ह्यात दिमाखाने उभ्या झाल्या आहेत आणि काही निर्माणाधीन आहेत, असेही श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार : एस.टी. कर्मचारी, चालक-वाहक यांच्यापण अडचणी असतात. चालक-वाहकांसाठी येथील बसस्थानकात सूचना पेटी लावण्यात येईल. त्यात त्यांनी आपल्या सूचना टाकाव्यात. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या अडचणी नक्कीच दूर केल्या जातील. लालपरी ही गरिबांची जीवनवाहिनी आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी एस.टी. बसने प्रवास करतात. त्यामुळे चालक-वाहकांवर मोठी जबाबदारी असते. त्यांनी निर्व्यसनी राहून आपली सेवा द्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांची संकल्पना ; बस स्थानकाची आकर्षक वास्तू : विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे म्हणाल्या, 1 जून 1948 मध्ये पहिली बस सुरू झाली. त्यावेळी राज्य परिवहन मंडळाकडे केवळ 36 बसेस होत्या, तर आज 36 हजारापेक्षा जास्त बसेस आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहरात बस स्थानकाची आकर्षक वास्तू उभी राहत आहे. यासाठी 16 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली असूनबस स्थानकाच्या कामाचे भूमिपूजन 26 जानेवारी 2018 रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले होते. कोरानामुळे काही काळ या बस स्थानकाचे काम प्रलंबित होते, मात्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कामाला गती दिली. 22 फलाटांचे हे बसस्थानक अतिशय सुसज्ज करण्यात आले आहे. यात प्रतीक्षालय, तिकीट आरक्षण कक्ष, उपहार कक्ष, वाणिज्य आस्थापना, चालक -वाहक कक्ष, विश्रांतीगृह, महिला विश्रांती गृह, अधिकारी कक्ष, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आदींचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच वन्यजीव संकल्पनेवर आधारित रंगरंगोटी सुद्धा करण्यात आल्याचे स्मिता सुतावणे यांनी सांगितले.

तत्पूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फित कापून बसस्थानकाचे लोकार्पण केले. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

The post जिल्ह्यातील सर्व बसस्थानके आदर्श करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *