मुंबई, दि. 12 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
The post विधिमंडळातील सहकारी आणि सर्वसामान्यांचा नेता गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली first appeared on महासंवाद.