लातूर, दि. 11 : जळकोट तालुक्यातील घोणसी तांडा (खंबाळवाडी) येथे जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाची निर्मिती केली जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले.
जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. श्याम डावळे यांच्यासह स्थानिक सरपंच, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
घोणसी तांडा (खंबाळवाडी) साठवण तलाव हा खंबाळवाडी गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी उपखोऱ्यातील स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. या तलावाच्या निर्मितीसाठी 15 कोटी 36 लाख रुपये निधीला मंजूरी देण्यात आली आहे.
घोणसी तांडा (खंबाळवाडी) या साठवण तलावामुळे 22.50 हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून परिसरातील 311 हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सुविधा निर्माण होणार आहे. यासोबतच परीसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास क्रीडामंत्री ना. बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.
००००००
The post घोणसी तांडा येथे साठवण तलावाचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन first appeared on महासंवाद.