मुंबई, दि. ११ :- यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटे तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची, स्नेहाची लयलूट करण्याचा सण आहे. विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. असत्यावर सत्याने, अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने, अशाश्वतावर शाश्वताने विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान, भक्ती, शक्तीची पूजा करतो. नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा दसरा हा सण आपल्या गौरवशाली संस्कृतीचे एक प्रतीक आहे. हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात निश्चितपणे आनंद घेऊन येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील बळीराजा, महिला, युवक यांच्यासह वंचित-उपेक्षितांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस यावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विविध घटकांसाठी शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. राज्य शासनाने सुरु केलेल्या लोकहिताच्या योजना पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्याठी प्रयत्न करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.
०००००
The post उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा first appeared on महासंवाद.