पुढील वर्षापासून महिला गणेशोत्सव मंडळांना विशेष पुरस्कार देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 9 : महाराष्ट्रात गणेशोत्सवात महिला मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास पुढील वर्षीपासून विशेष पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे आज पारितोषिक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव सुमंत पाष्टे रंगमंचावर उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सांस्कृतिक वारसा पुढे जावा, यासाठी शासन काम करत आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून ज्या संस्था, समूह, गणेश मंडळ उत्तम काम करतात, त्यांना शासनामार्फत पुरस्कार देण्यात येत असला तरी तो महाराष्ट्राच्या साडेतीन कोटी गणेश भक्त व शिवभक्तांच्या वतीने देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव विकास खारगे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी जे योगदान करत आहेत, त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जे चांगलं काम करतात त्यांना शाबासकी दिली पाहिजे, हा विचार करून सांस्कृतिक विभागाने ही गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली असून हे तिसरे वर्ष आहे. यामध्ये आपल्याकडील काही सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यात ज्यांनी काम केले त्यांच्याही कामाची दखल घेण्यात आली असल्याचे श्री खारगे यांनी सांगितले.

या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत भारतमाता गणेश मंडळ, परभणी यांना प्रथम, जय भवानी मित्र मंडळ ठाणे यांना द्वितीय तर वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव मंडळ, लातूर यांना तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. त्याचप्रमाणे एकूण 36 जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.गणेश तरतरे, प्रताप जगताप आणि सतीश कोलते यांनी काम पाहिले.

The post पुढील वर्षापासून महिला गणेशोत्सव मंडळांना विशेष पुरस्कार देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *