मुंबई, दि. ८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ९ ऑक्टोबर रोजी राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहन अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथील विविध कामांचे व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन आणि नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन
केंद्र सरकारने नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 900 नी वाढ होणार आहे. एकूण 35 महाविद्यालयात प्रतिवर्ष 4850 एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत. एकाच शैक्षणिक वर्षात मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयांमुळे ग्रामीण व दूरस्थ भागात विशेषोपचार आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे 7000 कोटी रुपये असून
सर्व आकारांच्या विमानांसाठी योग्य स्वतंत्र संचालनासह दोन समांतर धावपट्टी, विद्यमान धावपट्टीचे विस्तारीकरण आणि नवीन धावपट्टीचे निर्माण, दरवर्षी 14 दशलक्ष प्रवाशांच्या हाताळणीसाठी 3 लाख चौ. मी. च्या नवीन टर्मिनल इमारतीचा विकास, अंदाजे 9 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन कार्गो कॉम्प्लेक्सचा विकास करण्यात येणार आहे. एकाच वेळी सुमारे 100 विमाने सामावून घेण्यासाठी पार्किंग बे करण्यात येणार आहे.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत – अंदाजे 645 कोटी रूपये असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे. प्रवासी वहन क्षमतेमध्ये वाढ आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. विस्तारित टर्मिनल इमारतीमुळे शिर्डीमधील स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.
०००
The post प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राज्यातील विविध प्रकल्पांचे ई -भूमिपूजन, उद्घाटन first appeared on महासंवाद.