विकास कामांमुळे मुंबई आणि ठाण्याची ओळख होणार आधुनिक
ठाणे, दि.05 (जिमाका) :- आज महायुती सरकारने मुंबई-एमएमआरमध्ये 33 हजार कोटींहून अधिकचे प्रकल्प सुरू केले आहेत. आज 12 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोची पायाभरणीही झाली आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र, नैना प्रकल्प, छेडानगर ते आनंदनगर असा उन्नत ईस्टर्न फ्री-वे, ठाणे महापालिकेचे नवीन मुख्यालय, अशा अनेक मोठ्या विकासकामांची पायाभरणीही आज करण्यात आली. या विकासकामांमुळे मुंबई आणि ठाण्याची आधुनिक ओळख होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे 33 हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपूजन व उद्घाटन तसेच “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो – कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मुंबई मेट्रो मार्गिका – 3 टप्पा-1 (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक) शुभारंभ, ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमीपूजन, पूर्व मुक्त मार्ग विस्तार छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे प्रकल्पाचे भूमीपूजन, नैना नगर रचना परियोजनांतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमीपूजन, ठाणे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार, असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ, विधानपरिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार गणेश नाईक, संजय केळकर, प्रताप सरनाईक, किसन कथोरे, डॉ.बालाजी किणीकर, शांताराम मोरे, महेश चौघुले, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, तसेच आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, गीता जैन आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान श्री.मोदी पुढे म्हणाले की, आज एक मोठी आनंदाची बातमी घेवून महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ज्या परंपरेने देशाला ज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्याची समृद्ध संस्कृती दिली आहे त्याचा हा सन्मान आहे. त्याबद्दल मी देशातील आणि जगातील सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन करतो.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेबद्दल बोलताना त्यांनी या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना महिना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत, ही योजना महाराष्ट्रात अत्यंत यशस्वी होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून ते म्हणाले, नवरात्रीच्या काळात एकापाठोपाठ एक अनेक विकास कामांची उद्घाटने आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला मिळत आहे. ठाण्याला पोहोचण्यापूर्वी मी वाशिमला होतो. तेथे मला देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी जाहीर करण्याची आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. आता महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचे अनेक मोठे विक्रम ठाण्यात निर्माण होत आहेत. मुंबई-एमएमआर आणि महाराष्ट्राच्या विकासाचा हा सुपरफास्ट वेग आज महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची झलक देत आहे. आजच आरे ते बीकेसी, मुंबई या ॲक्वा लाइन मेट्रोचेही उद्घाटन होत आहे. अनेक दिवसांपासून मुंबईतील लोक या लाईनची वाट पाहत होते. आज मला जपान सरकारचेही आभार व्यक्त करायचे आहेत. या प्रकल्पासाठी जपानने जपानी आंतरराष्ट्रीय सहकार्य एजन्सीमार्फत भरपूर सहकार्य केले आहे. त्यामुळे एक प्रकारे ही मेट्रो भारत-जपान मैत्रीचेही प्रतीक आहे.
आज प्रत्येक देशवासीयाचे एकच ध्येय आहे – विकसित भारत! त्यामुळे आपल्या सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक संकल्प, प्रत्येक स्वप्न विकसित भारताला समर्पित आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुंबई-ठाण्यासारखी शहरे भविष्यात सज्ज करायची आहेत.
ते म्हणाले की, आज मुंबई महानगरात सुमारे 300 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार होत आहे. आज मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास कोस्टल रोडने 12 मिनिटांत पूर्ण होत आहे. अटल सेतूने दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतरही कमी केले आहे. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भूमिगत बोगद्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. असे अनेक प्रकल्प आहेत. वर्सोवा ते वांद्रे सागरी सेतू प्रकल्प, ईस्टर्न फ्रीवे, ठाणे-बोरिवली बोगदा, ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प अशा प्रकल्पांमुळे या शहरांचा चेहरामोहरा बदलत आहे. मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील समस्या कमी होतील. येथे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, येथे उद्योगधंदे वाढतील.
महामार्ग, द्रुतगती मार्ग, रस्ते आणि विमानतळांच्या विकासातही आम्ही विक्रम केला आहे आणि 25 कोटी गरीब लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे, असे सांगून आता देशाला खूप पुढे न्यायचे आहे. सर्व मिळून महाराष्ट्राची स्वप्ने पूर्ण करू, या शब्दात सर्व विकास प्रकल्प आणि विकासकामांच्या पूर्णत्वासाठी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी पैठणी शाल, महाराष्ट्राची ओळख असलेला पैठणी फेटा तसेच ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची प्रतिकृती व ठाण्याच्या दुर्गेश्वरी मातेची प्रतिमा देवून स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदिका मानसी सोनटक्के यांनी केले.
महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंचनापासून ते पायाभूत सुविधापर्यंत, उद्योगापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत, तरुणापासून ते ज्येष्ठांपर्यंत, परदेशी गुंतवणूकीपासून ते झोपडपट्टी पुनर्विकासापर्यंत अशा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ, विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे, निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार गणेश नाईक, संजय केळकर, प्रताप सरनाईक, किसन कथोरे, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, तसेच आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, गीता जैन आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, अमृताहूनही गोड असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानत ते म्हणाले, आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे. प्रधानमंत्री श्री.मोदी हे विश्वास, गती आणि प्रगती या तत्त्वावर विश्वास ठेवतात, त्यामुळे आज विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असून आजच्या दिवशी इंटरनल मेट्रो 29 कि.मी. ची सेवा सुरु होणार आहे. ठाण्याची वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणी होत आहे. सध्याच्या फ्री वे ला छेडानगर ते ठाण्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे. ठाणे ते मुंबई प्रवास वेगवान होणार आहे. नवी मुंबई विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. सिडकोच्या नैना प्रकल्पात देखील मोठी पायाभूत सुरु आहे. सिडकोची ही टाऊनशिप मुंबईची शान वाढविणारी ठरणार आहे. प्रधानमंत्री यांच्या हस्ते ज्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन होते, ते सर्व प्रकल्प पूर्ण होतात. आज ज्या प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे, त्या सर्व प्रकल्पांचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मेट्रो 3 चा पहिला टप्पा तसेच इतर विकास प्रकल्प यापूर्वी थांबविण्यात आले होते. त्या सर्व प्रकल्पांना या सरकारने चालना दिलेली आहे. मेट्रो 3 चा बीकेसी ते कुलाबा हा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार असून अटल सेतू, कोस्टल रोड असे मोठमोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. आज शुभारंभ झालेल्या मेट्रो 3 च्या माध्यमातून 20 लाख ठाणे व मुंबईकर प्रवास करणार आहेत असे सांगून या प्रकल्पाला अर्थसहाय्य दिलेल्या जपानच्या जायकाचे (Japanese International Co-opreration Agency) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.
माय मराठी भाषेला मोदींजींनी अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा जगभरातील मराठी माणासांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदींचे आभार मानतो. कारण आपल्या माय मराठी भाषेला मोदींजींनी अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. माय मराठीची पूजा मोदींजींच्या हातून झाली आहे.
एमएमआर रिजन मध्ये खूप मोठया प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. सगळ्यात महत्वाचे मुंबईची 40 कि.मी. लांबीची भूमिगत मेट्रो-3 ही आशियातील सर्वात मोठ्या मार्गिकेच्या आज पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदींजींच्या हस्ते होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, ही ग्रीन मेट्रो आहे. पर्यावरणाला साथ देणारी, पर्यावरणाचे संवर्धन करणारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाची मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत.
ठाण्यात अंतर्गत रिंग मेट्रो या कामाचा भूमिपूजन होत आहे. यामुळे ठाण्यातील वाहतूक सुरळीत होणार आहे. लोकांचे जीवन सुकर होणार आहे. सगळ्यात महत्वाचे ईस्टर्न फ्री वे आता थेट ठाण्यापर्यंत येणार आहे. नैना हे अटल सेतू आणि नवीन विमानतळ मधील भाग येथील कामाचा शुभारंभ आणि ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नमन करून आपल्या कार्याची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
१०० दिवसांत सरकारने मोदींच्या नेतृत्त्वात विकासाची सेंच्युरी मारली – उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रास्ताविक भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांच्या तिसऱ्या इनिंगची सुरुवात देखील दमदार झाली आहे. दि.18 सप्टेंबर रोजी मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील त्यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या 100 दिवसांत सरकारने मोदींच्या नेतृत्त्वात विकासाची सेंच्युरी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पहिल्या दोन इनिंगमध्ये म्हणजे त्यांच्या पहिल्या दहा वर्षात भारताच्या विकासाचा पाया मजबूत केला आहे. महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात दमदार विकास कामे होत आहेत. मोदींच्या स्वप्नातला भारत घडताना दिसत आहे.
पहिल्या 100 दिवसांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतले. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे वाढवण बंदर त्यासाठी जवळपास पाऊण लाख कोटी रुपयांचा निधी पंतप्रधानांनी दिला आहे. त्याचबरोबर अनेक वर्षापासून प्रत्येक मराठी माणसाची बहुप्रतिक्षित असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली आहे. याचा अभिमान मला आणि माझ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आहे, असे बोलून महाराष्ट्रासाठी असा अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल श्री.पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी पैठणी शाल, महाराष्ट्राची ओळख असलेला पैठणी फेटा तसेच ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची प्रतिकृती व ठाण्याच्या दुर्गेश्वरी मातेची प्रतिमा देवून स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदिका मानसी सोनटक्के यांनी केले.
या प्रकल्पांचे झाले भूमीपूजन व उद्घाटन…
महाराष्ट्रासाठी ₹33,000 कोटींच्या वेगवान विकासाची भेट
सुमारे 12 लाख प्रवाशांची रोज वाहतूक.
आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स 12.69 किमी
एकूण 10 स्थानके (7 भूमिगत 1 जमीन स्तरावरील स्थानक)
महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो
कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मुंबई मेट्रो मार्गिका – 3 टप्पा-1 (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स स्थानक) शुभारंभ.
मुंबई प्रवासात… वेळ आणि इंधन कपात
पूर्व मुक्त मार्ग विस्तार छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे प्रकल्पाचे भूमिपूजन
दक्षिण मुंबई-ठाणे प्रवास वेगवान होणार
ठाणे, नवी मुंबई आणि पूर्व उपनगराला दक्षिण मुंबईशी जोडणारा उन्नत मार्ग
छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे दरम्यान 13.40 किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग विस्तार
सुनियोजित शहराची उभारणी, आरामदायी जीवनमानाची हमी!
नैना नगर रचना परियोजनेंतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन
जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळाल्याने शहरांचा सुसज्ज विकास
प्रथम टप्प्या अंतर्गत 42 चौ. कि.मी. क्षेत्राचा विकास
9 उड्डाणपूल, 12 लहान पूल, 26 पादचारी भुयारी मार्ग, 1 वाहन भुयारी मार्ग आणि एकूण 17.59 कि.मी. लांबीच्या रस्त्याचा समावेश
सक्षम महिला… विचार पहिला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळाली गती
लाभार्थी महिलांना लाभाचे प्रातिनिधिक वितरण
आत्तापर्यंत 1.96 कोटी भगिनींना लाभाचे वितरण
प्रशस्त इमारत करेल नागरिकांचे स्वागत
ठाणे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
एकाच इमारतीत सर्व कार्यालय असल्याने नागरिकांना सुविधा मिळणार
किल्ल्याच्या स्वरूपात इमारतीची रचना
आधुनिक कार्यक्षमतेची 32 मजल्याची प्रशासकीय इमारत व महासभेची 5 मजली इमारत
00000