राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा

अकोला दि. 4: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन, साहित्य, माध्यम तसेच विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा जाणून घेतल्या.

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती व बुलढाणा जिल्हा दौऱ्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन झाले.  जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख  व इतर अधिका-यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे भेट देऊन तेथील पीक प्रात्यक्षिकाची पाहणी केली. आगमनानंतर राज्यपालांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली.

राज्यपालांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रारंभी राज्यपालांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याची वैशिष्ट्ये, विकास कामे स्थितीबाबत जाणून घेतले. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी सादरीकरण केले.

लोकप्रतिनिधींशी चर्चा

राज्यपालांनी जिल्ह्यातील आजी व माजी विविध लोकप्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली. खासदार अनुप धोत्रे, विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य रणधीर सावरकर, हरिश पिंपळे, माजी विधानसभा सदस्य नारायण गव्हाणकर, लक्ष्मणराव तायडे, तुकाराम बिरकड माजी विधान परिषद सदस्य वसंतराव खोटरे आदी उपस्थित होते. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या पुनर्गठनाबाबत निश्चित कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

लोकप्रतिनिधी, तसेच विविध गटांनी यावेळी विदर्भातील शेतकरी आत्महत्या, सिंचन अनुशेष, विविध कार्यालयांतील रिक्त पदे यासारखे विविध विषय मांडले. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

अकोला येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी सकारात्मकपणे कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. कृषी क्षेत्रात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबवावीत.   शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रत्येक तालुका, तसेच स्थानिक क्षेत्राचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना केल्या पाहिजेत.  शहरालगतच्या नद्या स्वच्छ राखण्यासाठी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रयत्न व्हावेत. नद्या प्रदूषित होणार नाहीत, यासाठी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करावी. कृषी विद्यापीठातील मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

पक्ष प्रतिनिधी, तसेच उद्योजकांशी चर्चा

अकोला इंडस्ट्री असोसिएशन, लघुउद्योग भारती, एमआयडीसी इंडस्ट्री असोसिएशन, विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींशी चर्चा करून राज्यपालांनी उद्योग क्षेत्रापुढील अडचणी जाणून घेतल्या. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करून त्यांनी विकासप्रक्रियेबाबत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कला, साहित्य, वाणिज्य, संस्कृती, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेऊन त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात उमेद जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलला राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी भेट दिली व तेथील उत्पादनांबाबत माहिती घेतली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *