जळगावमध्ये राज्यातील पहिला जल पर्यटन महोत्सव; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) द्वारा आयोजित महाराष्ट्रातील पहिला एमटीडीसी अॅक्वाफेस्ट २०२४ येत्या २ ते ४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मेहरूण तलाव, गणेश घाट, जळगाव येथे होणार आहे. या अनोखा महोत्सवाचे २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एमटीडीसीद्वारे आयोजित हा जलक्रीडा महोत्सव जळगाव शहरातल्या नागरिकांना जल पर्यटनाचा थरारक आणि अनोखा अनुभव अगदी परवडणाऱ्या दरात देणार आहे.

एमटीडीसी अॅक्वाफेस्ट २०२४ हा फक्त एक महोत्सव नसून तरुणांमध्ये साहसी क्रीडांविषयी आवड निर्माण करणे आणि जलसंपत्तीचे संवर्धन व जलसुरक्षेचे महत्व पटवून देणे हा आहे. पर्यटन सचिव जयश्री भोज व  महाराष्ट्र पर्यटन  विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मपविम “ॲक्वाफेस्ट”  (MTDC Aqua Fest) चा पहिला महोत्सव जळगाव येथे होत आहे.बोट सफारी, सुपर फास्ट जेट स्की राईड्स,सेलिंग बोट,कयाकिंग,फ्लाइंग फिश राईड,बनाना राईड,बंपर राईड,वॉटर झोर्बिंग,इलेक्ट्रिक शिकारा राईड,स्कूबा डायविंग अशा विविध राईडसचा जळगावकरांना आनंद घेता येणार आहे.

एमटीडीसीच्या या प्रकल्पामुळे फक्त पर्यटनच नव्हे तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. एमटीडीसीने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये एमटीडीसी अॅक्वाफेस्ट आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या मालिकेतील पहिला जलक्रीडा महोत्सव जळगावमध्ये होणार आहे. तिकीट आणि अधिक माहितीसाठी एमटीडीसी च्या अधिकृत समाजमाध्यमांवर तसेच रोहित अहिरे, मो. 9769165872 व निलेश काथार, मो.9421306870 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन एमटीडीसीने केले आहे. हा उपक्रम महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, सल्लागार सारंग कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली हा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

पर्यटन विभागातंर्गत एमटीडीसी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देत आहे. एमटीडीसी नाशिक बोट क्लब, गणपतीपुळे बोट क्लब आणि भारतातील सर्वात मोठे स्कूबा डायविंग प्रशिक्षण केंद्र, IISDA (Indian Institute of Scuba Diving and Aquatic Sports) ही जलपर्यटन आकर्षण लोकप्रिय होत आहेत.गोसेखुर्द (भंडारा व नागपूर), कोयना (सातारा), पेंच (नागपूर), उजनी (सोलापूर) या ठिकाणी जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करणार आहे. या प्रकल्पांचा उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये पर्यटनाचा विकास करणे आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा आहे. या उपक्रमामुळे जल पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशभरात अग्रगण्य राज्य म्हणून नावारूपाला येईल.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *