पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवलयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

सातारा, दि.२९-पाटण येथील केंद्र पुरस्कृत अमृत २.० नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे उपस्थित होते.

या पाणीपुरवठा योजनेची मूळ किंमत 16 कोटी 25 लाख 56 हजार इतकी आहे. या कामाला 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे 135 लिटर दरडोई पाणी देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत 110 मिमी ते 250 मिमी व्यासाची  38.964 किमी. पाईपलाईन असणार आहे.  तर 4,442 घरगुती नळ जोडण्या आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे पाटण शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

मल्हारपेठ येथील ग्रामपंचायत मालकीची तीन मजली इमारत 2001 मध्ये बांधण्यात आली होती. या जुन्या इमारतीवर जन सुविधा योजनेतून 50 लाख खर्चून ग्रामसचिवलयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सुसज्ज ग्रामसचिवालयामुळे मल्हारपेठ ग्रामस्थांना विविध सुविधा मिळणार आहेत. याचेही लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपंचायतीचे प्रशासक संतोष मोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *