नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यात करार

मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये नाविन्यपूर्ण नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यासाठी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड एनजीईएल (NGEL) यांच्यात मुंबई येथे संयुक्त उपक्रम करार झाला आहे. या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट 10 गीगावॅट क्षमतेचे रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि अक्षय ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येतील. जेणेकरून राज्याच्या ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार आहे.

या संयुक्त उपक्रमाचा एक भाग म्हणून महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड विविध अक्षय ऊर्जा प्रकल्प जसे की ग्राउंड माउंटेड सोलर, फ्लोटिंग सोलर, बॅटरी एनर्जी स्टोरेज, हायब्रीड सोलर, ई-प्रकल्प विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील आणि या अक्षय ऊर्जा प्रकल्पांमधून 40% वीज निर्मिती अपेक्षित आहे. ही भागीदारी महाराष्ट्राच्या 2030 च्या अक्षय ऊर्जा निर्मितीच्या ध्येयात लक्षणीय योगदान देईल, अशी अपेक्षा आहे.

या संयुक्त उपक्रमामुळे राज्यात तांत्रिक आणि गैर-तांत्रिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच सुमारे 30 हजार एकर बिगरशेती आणि नापीक जमीन या प्रकल्पासाठी वापरात येईल जी स्थानिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक येण्यास मदत होईल.

यावेळी महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी एनजीईएल सोबतचे हे सहकार्य राज्यातील नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधा वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचे पाऊल आहे असे सांगितले.

एनजीईएल चे सीईओ राजीव गुप्ता म्हणाले, एनजीईएल महाप्रितशी संलग्न होऊन ह्या अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी करतील. यावेळी महाप्रित आणि एनजीईएल चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *