प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. २३ :-  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने  प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. जिल्हा प्रशासन, पोलिस, महानगरपालिका, संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करावे. वाहतुकीचे नियोजन, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रालयात झालेल्या बैठकीस पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस आयुक्त (पिंपरी-चिंचवड) विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले,  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) पंकज देशमुख, पुणे महानगर परिवहन महामंडळ अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती दिपा मुधोळ मुंडे, पोलीस उपायुक्त वाहतूक पिंपरी चिंचवड बापू बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कृषी महाविद्यालय अधिष्ठाता महानंद माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, ससून सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता डॉ. व्ही.पी. काळे, शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यम्मपल्ले, विमानतळ संचालक संतोष डोके दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *