नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावासाठी प्रयत्न करणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुणे, दि.२१: पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यादृष्टीने महाराष्ट्राचे एक वेगळेपण असून संत महापुरुषांच्या ग्रंथानी, ओव्यांनी आपले जीवन समृद्ध आणि संपन्न केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे भक्तीमार्ग असून या मार्गाने लाखो वारकरी पायी जातात. वारकऱ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाकरीता सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल यांच्या प्रतिकृती, विजेची व्यवस्था, वृक्षाची पुर्नलागवड तसेच सुमारे ४२ हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत. आगामी काळात स्वयंसेवी संस्था आणि वारकऱ्यांनी या मार्गावर वृक्षारोपण करुन येत्या काळात हरित महामार्ग करण्याकरीता सहकार्य करावे.

एनएचएआयमार्फत नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत, कात्रज बोगदा ते रावेत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे ते शिरुर, पुणे ते छत्रपती संभाजीनगर अशी विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात १ लाख ५० हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येतील. याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन कामे करण्यात येतील. मुंबई- बेंगळुरू या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून पुण्याच्या वर्तुळाकार मार्गाला याचा लाभ होणार आहे, यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात वारीचे महत्त्व मोठे आहे. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता वर्षांनुवर्षे, शतकानुशतके अडचणीचा सामना करुन वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आशेने पंढरपूरकडे  मार्गक्रमण करीत असतात. वारीत पोहचू न शकणारे भाविक आपआपल्या देशातून दर्शनाचा लाभ घेतात, त्यामुळे आपली वारी आता वैश्विक झाली आहे. वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, रस्ते रुंद झाले पाहिजे, पालखी मार्ग वेगळा करुन त्या मार्गावर सर्व प्रकारच्या सोई असल्या पाहिजे यादृष्टीने काम होत आहे. वारकऱ्यांना पालखी तळावरही विविध सोई-सुविधा देण्याकरीता त्याठिकाणी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मदतीने कामे करण्यात येईल. येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वर्तुळाकार मार्गाबाबत आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुण्याहून सातारा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबईकडे जाताना वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत औद्योगिक विकासाला लागणाऱ्या पूरक बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात विविध पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. सार्वजनिक  वाहतूक व्यवस्थेकरिता मोठ्या प्रमाणात ई-बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आगामी काळात १ हजार ई-बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. आगामी काळात सर्व सोई-सुविधांयुक्त महत्त्वाचे शहर म्हणून पुणे शहर ओळखले जाईल. पुणे नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नामकरण करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल, आणि केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. पुण्याच्या मेट्रोचे एक एक टप्पे पूर्ण करण्यासोबत नवीन टप्पे मंजूर करण्याचे काम सुरु आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी ३ लाख ५० हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. हे पाहता पुणे शहराला मेट्रोची आवश्यकता लक्षात येते. त्यामुळे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित करण्याचे काम करण्यात येत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ म्हणाले, केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम पालखी मार्गांचे बांधकाम होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक महामार्ग निर्माण झाले आहेत, असेही केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ म्हणाले.

सहकार मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, पुणे शहर एक मोठे केंद्र झाले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरीता पुणे ते छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच तळेगाव ते चाकण रस्त्यांची प्रलंबित कामे करुन प्रश्न मार्गी लावावी. देहू, आळंदी आणि पंढरपूर विकास आराखड्याला गती देण्याकरीता केंद्र सरकारने सहकार्य करावे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले की, पालखी महामार्गांवरून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत; दिवसेंदिवस वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पालखीतळाच्या ठिकाणी कायमस्वरूपी निवारा आणि शौचालयाची व्यवस्था करावी, अशी सूचना करुन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना सहकार्य करण्यात येईल, असे मंत्री श्री. पाटील म्हणाले.

यावेळी खासदार श्रीमती कुलकर्णी, श्रीमती सुळे व आमदार श्री. तापकीर यांनीही विचार व्यक्त केले. श्री. श्रीवास्तव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक ९६५ अंतर्गत दिवेघाट ते हडपसर या पॅकेज ६ च्या कामाचे चौपदरीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची एकूण लांबी १३.२५ किलोमीटर इतकी असून त्याची किंमत ८१९ कोटी रुपये असणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे, या प्रकल्पाची एकूण किंमत ८० कोटी रुपये इतकी असणार आहे, या कामांचे कळ दाबून आभासीपद्धतीने भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *