उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोहोळ विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ

सोलापूर, दिनांक 22(जिमाका)- मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनगर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच मोहोळ शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खासदार सुनिल तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, उपविभागीय अधिकारी पंढरपूर/मोहोळ सचिन इथापे, तहसिलदार सचिन मुळीक, मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके, अनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरेश भदर,अभियंता गणेश बागल आदी मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मोहोळ तालुक्यात नगर विकास विभागाच्या “नगारोत्थान महाभियान” या योजनेच्या माध्यमातून अनगर नगरपंचायतचा पाणी पुरवठा प्रकल्प योजनेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या हस्ते आज अनगर ता.मोहोळ येथे पार पडला. या योजनेसाठी 78 कोटी 85 लाखाचा निधी मंजूर आहे ही योजना पूर्ण झाल्यानंतर अनगरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा नियमितपणे करणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मोहोळ शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकनेते बाबुराव अण्णा पाटील चौक मोहोळ येथे पार पडले.

मोहोळ शहरामध्ये सद्यस्थितीत मलनिस्सारण हे उघड्या गटारीतून केले जात असून सदरील मलनिस्सारण हे शहरामधील नाल्या मध्ये सोडले जाते व नंतर ते पाणी सीना नदीमध्ये जाते, त्यामुळे नदी प्रदूषित होत असून उघड्या गटारींमुळे शहरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोळ शहराच्या पुढील 30 वर्षाच्या लोकसंख्या विचारात घेऊन नवीन भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आलेली आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर मोहोळ शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *