बहुजन कल्याणाच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही – अतुल सावे

किल्लारी येथील कल्याणकारी योजनांच्या जागराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 लातूर, दि. १८ : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्गाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती, आश्रमशाळा, तांडा वस्तीच्या विकासासाठी निधी, घरकुल योजना, विविध महामंडळांच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यामाध्यमातून बहुजन समाजाच्या कल्याणाचा शासनाचा प्रयत्न असून या योजनांसाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात ‘उत्कर्ष बहुजनांचा, संकल्प बहुजन कल्याणाचा’ या संकल्पनेतून आयोजित विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास वर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘विविध कल्याणकारी योजनांचा जागर’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ना. सावे बोलत होते. आमदार योगेश टिळेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक दिलीप राठोड, सहायक संचालक शिवकांत चिकुर्ते, औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यवाह नरसिंग झरे यावेळी उपस्थिती होते.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील ९७८ आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. धनगर समाजातील मुलांना नामांकित शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी यावर्षी १६ हजार ५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास मंजुरी दिलेली आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्गाच्या ७५ विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याचे ना. सावे यांनी सांगितले.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील बेरोजगार युवकांना कर्ज योजना आणि व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जात आहे. राज्य शासनाने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ अशी विविध विकास महामंडळे स्थापन केली आहेत. यामाध्यमातून बहुजन कल्याणाच्या योजना राबविण्यात येणार असल्याचे सावे म्हणाले.

वंचितांना न्याय देण्याचे काम राज्य शासनामार्फत होत आहे. विमुक्ती जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी १ हजार ५५४ अभ्यासक्रमांना राज्य शासन शिष्यवृत्ती देत आहे. या योजनांची माहिती तळागाळातील लोकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले. तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत औसा मतदारसंघात वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत सुमारे ११ कोटी निधी उपलब्ध करून दिला. तसेच लातूर जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजनेतून सुमारे ३१ कोटी रुपये निधी दिल्याबद्दल त्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. सावे यांचे आभार मानले.

आमदार योगेश टिळेकर यांनीही आपल्या मनोगतामध्ये राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने सर्वेक्षण करून राज्यातील सुमारे ६ लाख भटक्या विमुक्तांना आधारकार्ड, रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली आहे. यानिमित्ताने शासन भटक्या विमुक्तांच्या पालावर पोहचले. त्यांना विविध योजनांचा लाभ दिला, असे सांगून भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यवाह नरसिंग झरे यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे वाटप

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभ प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये औसा येथील दिलीप शंकरराव गोदमे यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण विभागाच्यावतीने गृहपयोगी साहित्य, किनीथोट येथील अंगद भाऊराव काळे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीर, अपचुंदा येथील रामेश्वर ज्ञानोबा कात्रे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी आवास योजनेतून घरकुल, किल्लारी येथील श्रीमती द्वारकाबाई पांढरी गायकवाड यांना संजय गांधी निराधार योजनेतून निवृत्तीवेतन लाभ वितरीत करण्यात आला.

पारंपारिक वेशभूषेत आलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील बांधवांनी प्रारंभी मान्यवरांचे स्वागत केले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या विविध दालनांचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक दिलीप राठोड यांनी केले. गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *