विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘महावाचन उत्सव’

मुंबई, दि. 12 : व्यक्तिमत्व विकासाचे तसेच सृजनशीलता वाढीस लागण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे वाचन! वाचनामुळे आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी त्यांना पुस्तकांकडे आकर्षित करावे आणि लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागामार्फत महावाचन उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात 11 सप्टेंबर, 2024 पर्यंत 96,639 (88.95 टक्के) शाळांमधून 12,30,557 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर.विमला यांनी दिली आहे.

मोबाईल, टीव्ही, संगणक आदी स्क्रीनच्या वेडामुळे हल्ली मुले वाचनाच्या आनंदापासून दूर जाताना दिसत आहेत. अशावेळी त्यांना पुन्हा पुस्तकांच्या सहवासात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महावाचन उत्सव या उपक्रमाची सुरुवात केली आहे. हा उपक्रम 20 सप्टेंबर, 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.

महावाचन उत्सवाचे ब्रँड अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन

मागील वर्षी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये 66 हजार  शाळा व 52 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याची पडताळणी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ मार्फत करण्यात आली होती. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. हा प्रतिसाद लक्षात घेऊन सन 2024-25 या वर्षी देखील रिड इंडिया यांच्या सहकार्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाकरीता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात असून त्यांनी देखील सर्वांना दररोज किमान 10 मिनीटे नवीन काही वाचनाचे आवाहन केले आहे.

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी इयत्ता तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी असे तीन गट निश्चित करण्यात आले आहे.

उपक्रमाची उद्दिष्टे

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे. दर्जेदार साहित्याचा व लेखक, कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे ही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत.

उपक्रमाचे स्वरुप

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी www.mahavachanutsav.org या नावाने वेब ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले असून राज्यातील सर्व शाळा नोंदणी करीत आहेत. सहभागी विद्यार्थ्यांनी आवडत्या पुस्तकाचे वाचन करुन वाचन केलेल्या पुस्तकाविषयी अभिप्राय लेखन करावयाचे आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना वाचन केलेल्या पुस्तकाविषयी अभिप्राय देण्यासाठी एका मिनिटाचा व्हिडिओ/ ऑडिओ क्लिप अपलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक हे राज्यस्तरीय नोडल अधिकारी असून जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत हा उपक्रम राविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असणार आहे.

परिक्षण व पारितोषिके

विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित स्वरुपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड तीन गटांसाठी स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. विजयी विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरुपात पारितोषिक तर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

ग्रंथ प्रदर्शन/ पुस्तक मेळाव्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना नवनवीन पुस्तकांची माहिती मिळावी व वाचनास प्रोत्साहित करावे या उद्देशाने यावर्षी प्रत्येक तालुक्यात ग्रंथ प्रदर्शन / पुस्तक मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यात त्या-त्या जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी ग्रंथालयांना तसेच विविध प्रकाशकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती आर.विमला यांनी दिली आहे.

00000

बी.सी.झंवर/वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *