राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चंद्रपूरच्या आशा बावणे ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारा’ने सन्मानित

आदिवासी क्षेत्रात सेवा आणि कोविड काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 11 : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव करण्यात आला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिका आशा बावणे यांना त्यांच्या 28 वर्षांच्या आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

आशा बावणे यांनी विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्यसेवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. श्रीमती बावणे यांनी डायरियाच्या प्रकोपावर नियंत्रण, हज यात्रेत आरोग्य सेवा, तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या लस मोहिमेचे विशेष कौतुक झाले.

या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 1973 पासून देण्यात येतात. 2023 पर्यंत 614 परिचारिका आणि परिचारकांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात आले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *