शासनाच्या योजना आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचणे आवश्यक – आंतरसिंग आर्य

धुळे, दिनांक 11 सप्टेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक गतीने पोहोचल्यास त्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यास निश्चितच मदत होईल. असे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंह आर्य यांनी केले.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंह आर्य हे दोन दिवसीय धुळे जिल्हा दौ-यावर आले होते. यावेळी जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितिनकुमार सिंग, परिविक्षाधीन अधिकारी डी. सर्वानंद, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, खाजगी सचिव राजीव सक्सेना, आयोगाचे संशोधन अधिकारी अंकितकुमार सेन, वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे सल्लागार,अमरीतलाल प्रजापती, दौरा समन्वयक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी नितिन गावंडे, उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे, संदीप पाटील, महेश शेलार, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांचेसह जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

श्री. आर्य म्हणाले की, आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन बाबत ज्या समस्या आहेत. त्या प्राधान्याने सोडविल्या पाहिजेत. आदिवासी भागात शिक्षण, आरोग्याच्या सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. वाडे, पाड्या, वस्यांबाबत रस्त्यांचीही सुविधा उपलब्ध करुन दिली पाहिजे. वनपट्टय्यांचे प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी. आदिवासी बांधवांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आदिवासी समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आश्रमशाळांची संख्या वाढवावी, त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलबध होण्यासाठी आरोग्य केंद्रांची संख्या वाढवावी. रोजगारासाठी मनेरगा अतंर्गत सर्व रस्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात यावे, जेणेकरुन रोजगाराबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. रोजगारासाठी स्थानिक पातळीवर कुकुटपालन व्यवसायाकरीता पोल्ट्रींची संख्या वाढवावी. केंद्र व राजय सरकारच्या योजनेची माहिती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा. आश्रमशाळेस महिन्यांतून एकदा भेट द्यावी. उपजिविकेसाठी वनोपज वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सोबतच वनपट्ट्यांचे वाटपही वेळेत करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

साक्री तालुक्यात शिक्षणाच्या अधिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी एकलव्य स्कुलसाठी प्रस्ताव पाठवावा. तसेच आदिवासी समाजातील नागरीकांच्या जमीन हडप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुचनाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणग्रस्तांच्या समस्यांवरही प्रशासनाशी चर्चा  केली. याबाबतच्या प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

जिल्हा प्रशासनाचे केले कौतुक

दोन दिवशीय दौऱ्यात शिरपुर व साक्री तालुक्यातील आश्रमशाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी येथे दिलेल्या भेटीवेळी व स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया तसेच आदिवासी बांधवांसाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करुन अध्यक्ष आंतरसिंग आर्या यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धिवरे यांनी जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्न, त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अध्यक्ष श्री. आर्या यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे आणि प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीस वरीष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांनी आयोगाची कार्यप्रणाली, दौऱ्याचा उद्देश आदिंबाबत माहिती दिली. तर संशोधन अधिकारी अंकितकुमार सेन यांनी आयोगाचे कार्यकक्षा, अधिकारी याबाबत माहिती दिली. उपस्थितांचे आभार प्रकल्प अधिकारी श्री. पाटील यांनी मानले.

एक पेड ाँ के नामअभियानातर्गत वृक्षारोपण

एक पेड माँ के नामअभियानांतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *