जनता दरबारात प्राप्त अर्जांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा व तात्काळ निपटारा करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.9- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन  करण्यात आले आहे. या जनता दरबारात प्राप्त अर्जांवर सकारात्मक निर्णय घेऊन अर्जदारांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने  करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
दौलतनगर तालुका पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पाटण तालुका डोंगरी तालुका आहे. येथील नागरिकांना कामासाठी शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे  लागू नये म्हणून जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते, असे सांगून पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले, या जनता दरबारच्या माध्यमातून अर्जदारांचे प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ज्या अर्जांचा जागेवरच निपटारा होत नाही त्या अर्जांबाबत वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.
जनता दरबाराचे आयोजन 2004 सालापासून करण्यात येत आहे. या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. आज प्राप्त झालेल्या अर्जांवर आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेण्यात येतील. त्याचबरोबर मागील जनता दरबारातील अर्जांवर प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, असेही निर्देश पालकमंत्री श्री.देसाई यांनी दिले. दौलत नगर येथे झालेल्या जनता दरबारामध्ये हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. अर्जदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध विभागांचे एकूण बारा टेबल लावण्यात आले होते. पालकमंत्री श्री. देसाई यांनी नागरिकांचे स्वतः अर्ज घेऊन त्यांच्या समस्या ही जाणून घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *