मरावे परी देहरुपी उरावे..; चला…मरणानंतरही जिवंत राहूया…!

अवयवदान करा..अवयवदान करा..!

कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ उमजावणारी आहे…
आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं..
रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं…
शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं…
मधली पानं आपणच भरायची असतात…
तेच आपलं कर्म असतं…!
या कवितेचा भावार्थ लक्षात घेतल्यावर आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ उमगतो. आपण रक्तदान, अवयवदान यासारख्या कृतीमुळे आपल्याला जिवंतपणी रक्तदान करुन आणि आपल्या मरणानंतर अवयवदान करुन मानव धर्माचे खऱ्या अर्थाने पालन करण्याची संधी प्राप्त होते.
म्हणूनच आजच्या या लेखातून अवयवदान व त्याचे महत्व समजून घेवूया आणि पुढील आयुष्यासाठी मानवी दृष्टीकोनातून योग्य तो निर्णय घेवूया…!
अवयवदान म्हणजे काय?
• जिवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय.
• अवयवदान श्रेष्ठदान असून ज्याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अंतिम स्वरूपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.
• ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे.
अवयवदान प्रत्यारोपण प्रतिरूप म्हणजे काय?
मानवी अवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धी आहे. या उपचारात एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करून तो एखाद्या गरजवंत रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करतात.
ज्यांचा एखादा अवयव कायमस्वरूपी निकामी झाला आहे, अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित व उपलब्ध अशी उपचार पद्धती आहे.
आपण कोणत्या अवयवांचे दान करू शकतो?
* मेंदू स्तंभ मृत्यू (Brain Death)- मृत व्यक्तीची हृदयक्रिया चालू आहे पण तिचा मृत्यू झाला आहे, अशी व्यक्ती बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे डम यांचेदेखील दान करू शकते.
* सामान्य मृत्यू (Normal Death)- मृत व्यक्तीची जिची हृदयक्रिया बंद पडली आहे, अशी व्यक्ती फक्त डोळे व त्वचा या अवयवांचे दान करू शकते.
• जिवंत व्यक्ती (Live Donor)- जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयवदान करू शकते.
रुग्ण दात्याचे जवळचे नातेवाईक म्हणजे आजी, आजोबा, नातू, मुलगी, मुलगा, आई-वडील, भाऊ-बहीण अथवा पती किंवा पत्नी हे असावे लागतात.
या व्यतिरिक्त कोणालाही रुग्णासाठी अवयवदान करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते.
शासन रुग्ण व दाता यामध्ये काही आर्थिक देवाण-घेवाण नसून फक्त प्रेम व स्नेह या नात्यानेच अवयवदान होत आहे,याची खात्री झाल्यावरच परवानगी देते.
जिवंत व्यक्ती फक्त काही मर्यादित अवयवांचे म्हणजे मूत्रपिंड अथवा यकृताचा काही भाग दान करू शकतो.
मस्तिष्क मृत्यू म्हणजे काय?
वैद्यकीय शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची चेतना व श्वासोच्छवास कायमस्वरूपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित करता येते.
या दोन्हीचे केंद्र आपल्या मेंदूतील मस्तिष्क स्तंभ या भागात असतो.
अपघातात डोक्याला मार लागल्यास मेंदूत रक्तस्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायमस्वरूपी इजा झाल्यास या व्यक्तीचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू होऊ शकतो.
एखाद्या व्यक्तीचे अतिदक्षता विभागात उपकरणांच्या सहाय्याने हृदय कृत्रिमरित्या क्रियाशील ठेवले असेल तसेच काही ठराविक प्रमाणात चाचण्यांच्या आधारे तिचा मस्तिष्क स्तंभ मृत झाल्याचे निश्चित झाले तर त्या व्यक्तीस मृत घोषित करता येते.
अशा व्यक्तीचे ह्दय जास्तीत जास्त 16 ते 72 तासापर्यंत कृत्रिमरित्या क्रियाशील ठेवता येते व याच कालावधीत प्रमुख अंतर्गत अवयवांचे दान होऊ शकते.
यासाठी त्या रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते.
असे अवयवदान फक्त शासनाने प्रतिरोपणासाठी मान्यता दिलेल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्यासच असू शकतो.
मस्तिष्क स्तंभ मृत्त अथवा ब्रेन डेड व्यक्ती जगण्याची काही शक्यता असते का? या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे आहे.
• एखाद्या व्यक्तीस मस्तिष्क स्तंभ मृत्यू अथवा ब्रेन डेड घोषित केले असेल तर ती व्यक्ती जगण्याची शक्यता अजिबात नसते व ती व्यक्ती मृत असते.
• मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती व कोमातील रुग्ण यामध्ये फरक आहे.
• कोमातील रुग्ण मृत नसतात व ते परत जगण्याची शक्यता असते. तसेच मस्तिष्क स्तंभ मृत घोषित करणे म्हणजे इच्छामरण असे बिलकुल नाही.
• मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती ही मृत असते.
अवयवदान करायचे असल्यास मृत्यू हा रुग्णालयात येणे गरजेचे आहे का? याचे उत्तर “होय” आहे.
• मस्तिष्क स्तंभ मृत्यू हा प्रतिरोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातच घोषित करता येत असल्याने अशा रूग्णालयातील अतिदक्षता विभागातच मृत्यू झाल्यास अवयवांचे दान होऊ शकते.
• परंतु डोळे व त्वचा यांचे दान मृत्यूनंतर सहा तासापर्यंत घरी मृत्यू झाला असेल तरी होऊ शकते.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू घोषित करणे व अवयवदान कायदेशीर आहे का? याचे उत्तर “होय” असे आहे.
भारतामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार नुसार मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान या दोन्हींना मान्यता दिली आहे. या कायद्याची खालील विशेष उद्दिष्टे आहेत-
•मस्तिष्क स्तंभ मृत्यूला मान्यता देणे जेणेकरून मृत्यूनंतर अवयवदान होऊ शकेल.
•रुग्णांच्या उपचारासाठी मृत व्यक्तीचे अवयव काढणे, साठविणे व प्रतिरोपण करणे, यावर नियंत्रण ठेवणे.
•मानवी अवयवांच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे, कायद्याने अवयव विकणे व विकत घेणे व त्यासाठी जाहिरात करणे किंवा अवयव मिळवून देण्यासाठी व्यापारी तत्त्वावर मध्यस्थी करणे, यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
अवयवदानानंतर मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीचे शरीर त्यांच्या नातेवाईकांना परत दिले जाते का? होय.
मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीचे अवयव काढल्यानंतर त्यांचे शरीर सन्मानपूर्वक त्यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी परत दिले जाते.
अवयवदान व देहदान या दोन्हीमध्ये फरक आहे. देहदानामध्ये मृताचे शरीर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ठेवून घेतले जाते तर अवयवदानमधील अवयव प्रत्यारोपणासाठी वापरले जातात व शरीर नातेवाईकांना परत केले जाते.
दान केलेल्या अवयवांचे वितरण कसे होते, ते फक्त श्रीमंत व्यक्तींनाच दिले जातात का? याचे उत्तर “नाही” असे आहे.
गरजू रूग्णांचे वय, रक्तगट त्यांच्या आजाराची तीव्रता, ते किती दिवस अवयवांची प्रतिक्षा करीत आहेत, त्यांची वैद्यकीय गरज या सर्वांसाठी प्रत्येक रुग्णास गुण दिले जातात. या सर्व गरजू रूग्णांची एक सामायिक प्रतिक्षा यादी केली जाते व सर्वाधिक गरजू रुग्णास अवयव दिला जातो. रुग्णांची आर्थिक स्थिती, त्यांची जात व धर्म, याची प्रतिक्षा यादीत त्यांचे स्थान ठरविताना काही संबंध नसतो.
अवयवांचे वितरण हे महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्यामार्फत पारदर्शकपणे होते.
मस्तिष्क स्तंभ मृत दात्याच्या नातेवाईकांना अवयव कोणाला दिले आहेत हे कळू शकते का? याचे उत्तर “नाही” असे आहे.
नातेवाईकांना अवयव मिळालेल्या रुग्णाचे नाव व पत्ता सांगितला जात नाही.
अवयवदान केल्याने मस्तिष्क स्तंभ मृत दात्याच्या शरीरावर काही विद्रूपता येते का? याचे उत्तर “नाही” असे आहे.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू दात्यास ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्याचे अवयव काळजीपूर्वक काढले जातात व शरीरावर विद्रूपता येत नाही. एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिया जितक्या काळजीपूर्वकरित्या केली जाते, तितक्याच काळजीपूर्वकरित्या मस्तिष्क स्तंभ मृत्यू दात्याचे अवयव काढले जातात, जखम पुन्हा शिवली जाते. शरीरावर, पोटावर अथवा छातीवर शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात.
अवयवदानाला धर्माची परवानगी आहे का? याचे उत्तर “होय” असे आहे.
भारतातील सर्व धर्मांनी अवयवदानाला पाठिंबा दिला आहे व अवयवदान हे एक पुण्याचे काम मानले आहे.
अवयवदान केल्यानंतर मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला काही मोबदला दिला जातो का? याचे उत्तर “नाही” असे आहे.
अवयवदानासाठी मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला आर्थिक अथवा कुठल्याही स्वरुपाचा मोबदला दिला जात नाही. म्हणून अवयवदान हे शुद्ध व श्रेष्ठ ठरते. परंतु अवयवदानाला संमती दिल्यानंतर अवयवदानासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांचा तसेच इतर काही वैद्यकीय खर्च मृतांच्या नातेवाईकांना करावा लागत नाही.
अवयवदान करायची इच्छा असल्यास काय करावे?
एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे दान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीपत्र भरणे आवश्यक आहे. संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या सज्ञान नातेवाईकांची सही घेणे देखील आवश्यक आहे. असा फॉर्म भरल्यानंतर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाईल.
हे कार्ड दात्याने सतत आपल्याजवळ बाळगावे. जेणेकरून त्यांच्या नातेवाईकांना अथवा मित्रपरिवाराला त्याच्या अवयवदान करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल.
जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीशिवाय अवयवदान होवू शकत नाही, म्हणून आपल्या अवयवदानाच्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.
अवयवदानाविषयीची अधिक विस्तृत माहिती www.dmer.org, www.notto.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेच. त्याशिवाय डोनर कार्ड व अवयवदानासंबंधी माहिती देण्यासाठी
• विभागीय स्तरावर मुंबई येथे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, एल.टी.एम.जी. हॉस्पिटल (सायन हॉस्पिटल) कॉलेज बिल्डिंग, दुसरा मजला, औषध भांडाराच्या बाजूला, सायन (पश्चिम) मुंबई-22, (www.ztccmumbai.org),
• विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, पुणे द्वारा के.ई.एम. हॉस्पिटल, रास्ता पेठ, पुणे-1, (www.ztccpune.org),
• विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती, औरंगाबाद, नॅफ्रॉलॉजी विभाग, एम.जी.एम.मेडिकल कॉलेज, एन-6, सिडको, औरंगाबाद 431003,
• विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयन समिती,नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानेवाडा, नागपूर-440003 येथे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती कार्यरत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव संताजी अटकोरे (मो.8087565172) यांनी या विषयावर “अवयवदान: पार्थिवाचे देणे” या पुस्तकातून अनेक मान्यवरांचे अनुभव आणि कर्तृत्व अतिशय समर्पक शब्दात गुंफले आहे. तर मुंबईतील प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, नवी मुंबई घणसोली येथील डॉ.थोरात, ठाणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती “अवयवदान” या विषयावरील समाजात जनजागृती वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.
या लेखाद्वारे आपल्याला “अवयवदान” या विषयाबाबत आवश्यक ती माहिती मिळालेली असेलच. माझ्यासह माझ्या कर्मचाऱ्यांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे… तर मग चला आपणही अवयवदानाचा संकल्प करु या अन् मरणानंतरही आपल्या अवयवरुपाने जिवंत राहूया…. आपले जीवन सार्थकी लावू या..!

मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी
ठाणे
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *