कोयना नदीवर उभारण्यात येणारे जल पर्यटन केंद्र लवकर सुरू करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.31-कोयना नदी पात्रातील रासाटी ते हेळवाक या दरम्यान पर्यटकांसाठी जल पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. हे जल पर्यटन केंद्र लवकर सुरू होण्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

चेंबरी तालुका पाटण येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार अनंत गुरव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता निलेश पोदार, सहाय्यक अभियंता सागर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या जल पर्यटनासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. येथील कामांच्या निविदा तात्काळ काढाव्यात. या जल पर्यटन अंतर्गत पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या बोटी घेण्यात येणार आहेत या बोटी चालवण्याचे प्रशिक्षण स्थानिकांना द्यावे. जल पर्यटना अंतर्गत मंजूर झालेल्या पायाभूत सुविधांची दर्जेदारपणे कामे करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जल पर्यटनासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबी तात्काळ दूर कराव्यात, अशा सूचना करून पालकमंत्री श्री देसाई यांनी जल पर्यटनाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी कोयनानगर येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस वासाहत जागेची व जल पर्यटन केंद्रांच्या जागेची पाहणी केली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *