राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी

मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र शासनाचे आभार

 

मुंबई, दि. २९ : उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.

राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध २०२४-२५ गाळप हंगामात उठवले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रस, सिरप, बी हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *