‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मुंबई शहर जिल्ह्यात आतापर्यत १ लाख, ६९ हजार २८ महिलांचे अर्ज

आतापर्यंत १ लाख ३० हजार ९७१ अर्ज पात्र – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई,दि.८ : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला  महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबई शहर  जिल्ह्यात आतापर्यत १ लाख ६९ हजार २८ महिलांचे  अर्ज प्राप्त झाले असून  १ लाख ३० हजार ९७१ अर्ज पात्र झाले आहेत. अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव  यांनी केले.

आज मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते.  या पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी तथा माझी लाडकी बहीण योजनेचे समन्वय अधिकारी  गणेश सांगळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे  सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड, समाज कल्याण  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी  श्री. यादव म्हणाले, मुंबई शहर जिल्ह्यामध्ये वॉर्ड स्तरावर एकूण ७५ मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ९ वॉर्ड मधील ५२ प्रभागामध्ये ७४ मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. अर्जाची छाननी करण्याचे काम अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका व बृहन्मुंबई महानगरपालिका यंत्रणा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर कार्यालयातील यंत्रणा यांनी सुरू  केले आहे.  यासाठी डी वॉर्ड येथे व एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत १ वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे,  अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी यावेळी दिली

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता  वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे  उमेदवारांना प्रत्यक्ष कामावर अनुभव यावा आणि त्यांना  यासाठी आर्थिक मदत म्हणून  विद्यावेतन देण्यात येणार आहे.

बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार, आयटीआय किंवा पदविकाधारक उमेदवारांना 8 हजार, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांना प्रतिमाह रुपये 10 हजार असे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात डीबीटी ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात  येणार आहे.

या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना आणि उद्योजक त्यांच्याकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के एवढे उमेदवार या योजनेअंतर्गत घेऊ शकतात. सेवा क्षेत्रासाठी आस्थापना यांच्याकडे एकूण कार्यरत उमेदवारांच्या 20 टक्के इतके उमेदवार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या 5 टक्के एवढे उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.

या योजनेचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी व औद्योगिक सेवा क्षेत्रातील आस्थापना, शासकीय निमशासकीय कार्यालये, बँका यांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी केले.

ही योजना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी उमेदवार व औद्योगिक आस्थापना यांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करावी व अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर, पहिला मजला, 175  डी एन रोड, फोर्ट, मुंबई येथे संपर्क साधावा.

ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजेनेमार्फत मोफत तीर्थ दर्शन यात्रेची संधी

सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अथवा कोणाची सोबत नसल्या कारणाने किंवा पुरेशी माहिती नसल्याने तीर्थ यात्रा करण्याचे राहून जाते.ही बाब लक्षात घेऊन  राज्यातील 60 वर्ष व त्यावरील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी  ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील मोठ्या तीर्थ स्थळांचे मोफत दर्शन मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत भारतातील एकूण 73 तीर्थस्थळे व महाराष्ट्र राज्यातील एकूण 66 तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकारिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येणार आहे. लाभार्थीला या यात्रेसाठी प्रति व्यक्ती रु. 30 हजार  इतकी प्रवासखर्चाची मर्यादा राहील. या प्रवासखर्चात प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास या बाबींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना

राज्यातील वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. वयोमानामुळे येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी तसेच आवश्यक साधने खरेदी करण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमार्फत शासनाकडून दरमहा 3 हजार  रुपये ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी  कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर प्रशासकीय इमारत, 4 था मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर (पू), मुंबई-71 या कार्यालयात अर्ज सादर करावा, असे सांगून मुंबई शहर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव सांगितले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *