मुंबई, दि. 5 : ठाणे येथील मे.सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रा. लि. कंपनीने त्यांच्याकडील कामगारांची थकित देणी व वेतन दिलेले नाही. कामगारांचे वेतन व थकित देणी देणे हे शासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कंपनीने कामगारांचे थकित देणे देण्याची योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मंत्रालयातील समिती कक्षात मे. सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस कामगार विभागाचे अप्पर आयुक्त संतोष भोसले, उपायुक्त प्रदीप पवार, सहाय्यक आयुक्त चेतन जगताप, कामगारांचे प्रतिनिधी शशांक खरे, श्री.चव्हाण आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणामार्फत (एनसीएलटी) या प्रकरणात कंपनीविरोधात कॉर्पोरेट इनसॉल्व्हन्सी रिझॉल्यूशन प्रोसेस (सीआयआरपी) सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता इंटरिम रिझॉल्यूशन प्रोफेशनल (आयआरपी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये निर्णय घेताना आयआरपी यांनी कामगारांचे हित लक्षात घ्यावे. त्यासाठी कामगार कार्यालयाकडे नोंदणीकृत किंवा कंपनीसोबत करारबद्ध कामगार संघटनेच्या दोन प्रतिनिधींना घेण्यात यावे. जेणेकरून निर्णय होताना कामगारांचे हित जोपासले जाईल. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी न दिल्यास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत कामगार संघटनांचे प्रतिनिधी व अधिकारी यांनी विविध मुद्दे मांडले.
0000
निलेश तायडे/विसंअ