नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. ५: सर्वात जास्त तक्रारी अर्ज महसूल, पोलिस आणि महानगरपालिका या विभागांच्या असतात. तक्रारदारला अर्ज निकाली निघणार असेल तर तातडीने मदत करा, अन्यथा रितसर लेखी देऊन नियम नमूद करून काम होणार नसल्याचे कळवा. वारंवार त्यांना अर्ज घेवून येण्याची वेळ येवू देवू नका, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन व जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले. यावेळी सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन आणि सिद्धगिरी मठ कणेरी यांच्यावतीने यशोवर्धन बारामतीकर यांनी पर्यावरपूरक गणेश मूर्ती पालकमंत्री व मान्यवरांना भेट दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,  इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उप वनसंरक्षक गुरुप्रसाद, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अति.आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका राहूल रोकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी नागरिकांच्या तक्रारी, समस्या स्वीकारुन त्यावर वेळेत अनुपालन सादर करण्याबाबत सूचना केल्या. या जनता दरबारामधे २६३ अर्ज दाखल झाले. जिल्हाधिकारी यांनी पुढील काळात आवश्यक कार्यवाही करुन सर्व प्रकरणे निकाली काढण्याच्या संबंधित प्रशासन प्रमुखांना सूचना दिल्या.

मागील ७ जनता दरबारमधील प्राप्त १९०६ अर्जांमधील १८३१ निकाली

मागील ४ सप्टेंबर २०२३ पासून झालेल्या ७ जनता दरबारमधील दाखल झालेल्या १९०६ अर्जांमधील १८३१ अर्ज निकाली निघाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यात जिल्हाधिकारी कार्यालयात २४५ पैकी २४० निकाली, तहसील व उपविभागीय कार्यालयात ४५५ पैकी ४४०, इतर जिल्हा विभाग १२०६ पैकी ११५१ अर्ज निकाली काढले. यातील ७७ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *