नागपूर येथे म्हाळगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन

नागपूर, दि. 3- मानेवाडा चौक, म्हाळगीनगर येथील उड्डाणपुलामुळे नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे. उड्डाणपुलामुळे रिंगरोड आता अधिक परिपूर्ण होईल. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  म्हाळगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपूल बांधकामाच्या भूमिपूजन समारंभाचे उदयनगर चौक, रिंगरोड  येथे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

गत दहा वर्षात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरात चांगले रस्ते, उड्डाणपूल निर्मितीतून जागतिक पातळीवरचा बहुमान नागपूरला दिला. चांगल्या रस्त्यांबरोबरच आरोग्य सुविधांवरही लक्ष देण्यात आले आहे. नागपुरातील सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये निधी आपण दिला आहे. यातून वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा आपण नव्याने उपलब्ध करून देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, गेल्या अनेक काळापासून या  भागात वाहतुकीची समस्या होती. उड्डाणपुलामुळे वाहतुकीची ही समस्या सुटेल. अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची उड्डाणपुलाची मागणी होती. आता उड्डाणपूलाचे भूमिपूजन झाल्यावर लवकरच हा उड्डाणपूल पूर्णत्वास येणार आहे.  या भागातील दळणवळणाची सुविधा या माध्यमातून सुकर होणार असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला आमदार मोहन मते यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *