विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी ‘संविधान मंदिर’ उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाची महती सांगण्याचा प्रयत्न – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई,  दि. ३ : महाराष्ट्रातील सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १६३ शासकीय तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिर उभारले जाणार आहे. या संविधान मंदिरांचे १५ ऑगस्ट २०२४ रोजी एकत्रित ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक सतीश सूर्यवंशी, सह संचालक डॉ. अनिल जाधव, केदार दहीबावकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे आम्ही संविधान मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना राज्यघटनेची महती, त्याचे महत्त्व समजावण्याचा उद्देश आहे. हे मंदिर विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल. त्यांना, त्यांच्या विचारांना आकार देईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण या ठिकाणी पूजली जाईल. योग्य विचारांनी प्रेरित झालेला कौशल्य संपन्न युवा स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि देशाची प्रगती साधण्याचे सामर्थ्य बाळगतो. त्यामुळे नीतिमंत विचार आणि हाताला रोजगार असणारी पिढी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

२६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी, यासाठी संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात निर्माण होणारी पवित्र वास्तू इतक्या पुरतेच या संविधान मंदिराचे अस्तित्व सीमित राहणार नाही. महिन्यातून एकदा येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीबाबत विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. नागरिकांमध्ये विशेषतः उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांबद्दल जागरूकता वाढण्यासाठी मोहीम आयोजित करणे, घटनात्मक समस्या, दुरुस्त्या, समकालीन समाजातील घटनेची भूमिका यासारख्या विषयांना घेऊन परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करणे, विद्यार्थ्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार समजून घेण्यास किंवा त्यांचा वापर करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना कायदेशीर सहाय्य आणि समर्थन प्रदान करणे, राज्यघटनेचे सखोल आकलन व्हावे यासाठी निबंध स्पर्धा व संबंधित कार्यक्रम आयोजित करणे यासह संविधानाच्या विविध पैलूंवर पुस्तके, लेख इत्यादी गोष्टी उपलब्ध करुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचा उद्देश आहे. संविधान दिवस, प्रजासत्ताक दिन यासारख्या विशेष महत्त्व असलेल्या दिवसांचे औचित्य साधून या दिवशी येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

मंत्री श्री. लोढा यांनी संविधान मंदिर आणि आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत नागरिकांच्या सूचनादेखील मागवल्या आहेत. नागरिक त्यांच्या सूचना ceo@mssds.in या ई-मेलवर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *