साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगाला प्रेरणादायी –  पालकमंत्री डॉ सुरेश खाडे

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : केवळ दीड दिवसाच्या शाळेत शिकलेले परंतु आपल्या अलौकिक प्रतिभेने सरस्वतीची सेवा करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे साहित्य हे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर जगाला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या मूळ गावी वाटेगाव येथे 104 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर, वाटेगावच्या सरपंच नंदा चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीबाई साठे तसेच नातू सचिन साठे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांनी आपली लेखणी ही समाजातील उपेक्षित वंचितांच्या तसेच कामगारांच्या प्रश्नांसाठी वापरली. त्यांनी संपूर्ण जगाला समतेचा विचार दिला. तसेच वाटेगावच्या विकासासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने वाटेगाव येथे आदर्श शैक्षणिक संकुल उभा राहावे यासाठी यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले तर अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे म्हणाले, अण्णा भाऊंची साहित्य निर्मिती ही वेदनेच्या आधारावर उभी होती. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे शोषित समाजातील दैन्य, दुःख, दारिद्र्य यांचे वास्तव मांडले तसेच आपल्या शाहीरीद्वारे (पोवाडा ) तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये समता आणि बंधुतेचा विचार घेऊन समाजाला पुढे जाता येईल असा विचार मांडला.

प्रारंभी बार्टीचे व्यवस्थापक सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी बार्टीद्वारे सुमारे दहा कोटी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी करण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकामध्ये सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बार्टीतर्फे उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे फित कापून उद्घाटन केले.

याप्रसंगी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, सम्राट महाडीक, सत्यजित देशमुख, जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष श्रीमती नंदिनी आवाडे, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेले नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *