ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. १ :- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात देशाला कांस्यपदक जिंकून देणारा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्राने महाराष्ट्राचा गौरव वाढवला असून राज्याच्या क्रीडाक्षेत्राला नवं चैतन्य, ऊर्जा दिली आहे, अशा शब्दात त्यांनी स्वप्नील कुसाळे याचे अभिनंदन केले आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्रीयन खेळाडूला मिळालेल्या वैयक्तिक पदकाचा आनंद अवर्णनीय आहे, असेही ते म्हणाले.

स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज स्वप्नील कुसाळे या खेळाडूने एकण ४५१.४ गुण प्राप्त करत कांस्य पदक मिळवलं आहे. कोल्हापूरजवळच्या कांबळवाडी गावातील स्वप्नीलने भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये आज तिसरं पदक मिळवून दिल्याचा महाराष्ट्रासह देशाला अभिमान वाटत आहे. इयत्ता सातवीत असताना त्याची क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झाली होती. भोसला मिलिटरी स्कूलमध्येही त्याने सराव सुरु ठेवला होता. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणाच्या जोरावर त्याने ऐतिहासिक कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्वप्नील कुसाळे याने वर्ष २०१२ पासून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सुमारे १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करून उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली आहे. आपल्या अतुलनीय कामगिरीने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या स्वप्नीलबद्दल महाराष्ट्रवासियांना अभिमान आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचून नेत्रदीपक कामगिरी केलेल्या स्वप्नीलने यापूर्वी २०२२ मध्ये एशियन गेम्समध्ये सांघिक सुवर्णपदक मिळवले होते. आज त्याने ऐतिहासिक कामगिरी करून आपल्या आई-वडिलांसह समस्त कोल्हापूर आणि महाराष्ट्रीय नागरिकांची शान वाढविली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत.

———-०००००——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *