हिंगोलीत साकारणार भव्य ‘कामगार भवन’; राज्य शासनाकडून १४.१२ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. १४: जिल्ह्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी भव्य ‘कामगार भवन’ उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी १४ कोटी १२ लाख ३५ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय १३ मे रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार, हे भवन मौजे हिंगोली येथील सर्वे क्र. ६० आणि ६३ मधील एकूण ३३ आर (३३०० चौ.मी.) जागेवर उभारले जाणार आहे. इमारतीमध्ये पार्किंग मजल्यासह तळमजला, पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्याचे नियोजन आहे. इमारतीचे एकूण बांधकाम २११४.९८ चौ.मी. आहे.

 या इमारतीत कामगार अधिकारी कार्यालय, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, घरेलू कामगार कल्याण मंडळ आणि माथाडी कामगार बोर्डाची कार्यालये स्थलांतरित केली जातील. इमारतीत फर्निचर, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा प्रकल्प आणि दिव्यांगांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध असतील.

सध्या हिंगोली येथील कामगार विभागाची कार्यालये खासगी भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहेत. जागेच्या कमतरतेमुळे दैनंदिन कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि शासनाचा भाड्यावर होणारा खर्च वाचवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तांत्रिक यंत्रणा म्हणून काम पाहणार असून, निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

0000

निलेश तायडे/ वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *