उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी

पुणे, दि. ११ : मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांकडून बचाव कार्याचा सविस्तर आढावा घेतला आणि दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके, महापौर रवी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम व तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, “मोशी येथे घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि संवेदनशील आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना या दुर्घटनेच्या पहिल्या दिवसापासून मी संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून होते. तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर माध्यमांद्वारे मी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून बचावकार्याचा आढावा घेत होते.”

“कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, सततचा पाऊस आणि ढिगाऱ्याची गुंतागुंतीची रचना यामुळे बचावकार्यात काही अडथळे निर्माण झाले. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित पथकांच्या मदतीने शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटनास्थळावरून बाहेर काढण्यात येणारे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सन्मानपूर्वक दाखवावेत, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.” असेही त्यांनी सांगितले.

दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवालानुसार जे कोणी जबाबदार आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच बाधित कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी संबंधित कंपनी, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या तिन्ही स्तरांवरून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे.”

नातेवाईकांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, “मी स्वतः बाधितांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांच्या भावना, अडचणी आणि मागण्या जाणून घेतल्या आहेत. लवकरच राज्य शासन, महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंपनी यांच्या संयुक्त बैठकीत त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून त्यांना न्याय मिळेल, यासाठी आवश्यक त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल.”

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *