सौर प्रकल्प प्रक्रिया गतीमान करण्यावर शासनाचा भर – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २८ : राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. सौर प्रकल्पांना वेळेत गती मिळावी व गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी शासकीय प्रक्रिया गतिमान करण्यात येणार असल्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाबाबत या क्षेत्रातील जाणकारांच्या सूचना आणि हरकतींसंदर्भात चर्चा करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री अतुल सावे म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्प जलदगतीने कार्यान्वित झाल्यास राज्यातील ऊर्जा उत्पादन वाढण्यास मदत होईल. यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. सौर प्रकल्पांशी संबंधित मंजुरी, करार प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींविषयी लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत नव्या ऊर्जा धोरणातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी CII च्या प्रतिनिधींनी नवीन धोरणाबाबत समाधान व्यक्त केले.

0000

शैलजा पाटील / वि.सं.अ

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *