राज्यात ४था क्रमांक; खाजगी गुंतवणुकीत १४२ कोटींची उभारणी
सोलापूर, दि. १९: जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असलेल्या आणि नियोजन विभाग अंतर्गत असलेल्या महास्टाराईड ऑपरेशन (MahaSTRIDE Operation) मध्ये सोलापूर जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी राज्यातील १३ जिल्ह्यांची निवड झालेल्या यादीत सोलापूरचा समावेश असून, जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह ग्रँट (Performance-Based Incentive Grant) मंजूर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांना पत्र पाठवून या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.
सोलापूरचा स्कोर आणि क्रमांक
पत्रानुसार सोलापूर जिल्ह्याला यावेळी 82% Composite Score मिळाला आहे. यामुळे राज्यातील १३ पात्र जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा ४था क्रमांक लागला आहे. तसेच पुणे विभागातील ४ जिल्ह्यांमध्ये ३रा क्रमांक मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या District Strategic Plans ची मुख्यमंत्री यांनी विशेष दखल घेतली आहे.
१४२ कोटी खाजगी भांडवल उभे
मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्याने Annual Strategic Action Plan राबवण्यासाठी जवळपास १४२ कोटी रुपयांचे खाजगी भांडवल उभे केले आहे. यामुळे सोलापूर गुंतवणुकीसाठी एक आकर्षक जिल्हा म्हणून पुढे येत आहे. राज्याच्या “विकसित महाराष्ट्र” या संकल्पनेला बळ देण्यात सोलापूरचा मोठा वाटा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अनुदानाचा वापर
या कामगिरीच्या सन्मानार्थ सोलापूर जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाच्या वापरासाठीच्या सविस्तर अटी MITRA विभागाकडून जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, जिल्हा प्रशासनाने या गतीने काम करत राहावे. विशेषतः खाजगी भांडवल उभारणी आणि जिल्ह्याचे *GDDP म्हणजेच Gross District Domestic Product* वाढवण्यासाठी अधिक महत्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवावीत.
सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत १६ कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर झाल्याबद्दल जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांनी नियोजन भवन येथे केला. यावेळी नियोजन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याच्या या यशामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही तो एक आदर्श ठरणार आहे.
00000