मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबई येथील श्री धाकलेश्वर मंदिर, महालक्ष्मी कंपाऊंड, भुलाभाई देसाई रोड, मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार शुभदा वराडकर यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचा समृद्ध आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ अंतर्गत आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देणारा ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच समाजात सांस्कृतिक जागर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पारंपरिक कला, संस्कृती आणि आध्यात्मिक मूल्यांचा संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार असून, विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे भारतीय परंपरेची समृद्धता अधोरेखित केली जाणार आहे.
हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कार्यक्रम विनामूल्य असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
000
संजय ओरके/विसंअ