‘सुपर एल निनो’: २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

 निसर्गाचे चक्र बदलत असून यंदा उन्हाळ्याने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, २०२६ हे वर्ष भारताच्या हवामान इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. या भीषण परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ‘हीट वेव्ह’चा (उष्णतेची लाट) इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक हवामान बदलामध्ये ‘सुपर एल निनो’ ही घटना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समुद्र सपाटीचे तापमान वाढल्यामुळे जगभरातील हवामानावर याचे विपरीत परिणाम होतात. यामुळे भारतात मान्सूनवर परिणाम होण्याची आणि उन्हाळ्याची तीव्रता कमालीची वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक राज्यांत तापमान ४५°सेल्सीअस वर जाण्याचे संकेत आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मानकानुसार किनारी प्रदेशासाठी: सलग दोन दिवस कमाल तापमान ३७°सेल्सीअस पेक्षा जास्त राहिल्यास. जेव्हा तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा ४.५°सेल्सीअस ते ६.४°सेल्सीअस ने वाढते, तेव्हा त्याला ‘उष्णतेची लाट’ म्हणतात.  : जेव्हा तापमान सरासरीपेक्षा ६.५°सेल्सीअस पेक्षा जास्त वाढते, तेव्हा अतिउष्ण लाट (Severe Heat Wave) ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.

उष्माघाताची लक्षणे: वेळीच ओळखा धोका

उष्माघात ही केवळ थकव्याची अवस्था नसून ती एक वैद्यकीय आणीबाणी आहे. खालील लक्षणे दिसताच सावध व्हावे:

१. शरीराचे तापमान कमालीचे वाढणे पण घाम न येणे.

२. चक्कर येणे, डोकेदुखी किंवा मळमळणे.

३. त्वचा कोरडी आणि लाल होणे.

४. तीव्र तहान लागणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे.

५. लहान मुलांमध्ये प्रचंड चिडचिड आणि सुस्ती येणे.

उष्णतेपासून बचावासाठी ‘हे’ करा (मार्गदर्शक सूचना)

 जलसंजीवन मंत्र

तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या.

निसर्गदत्त पेयांचा वापर करा: लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी, आमसूल सरबत आणि घरगुती पन्हे शरीरातील ओलावा टिकवून ठेवतात.

पोशाख आणि घराबाहेर पडताना काळजी

बाहेर पडताना नेहमी सुती, हलके आणि पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे घाला.

डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स वापरा.

शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा.

आहारातील बदल

प्रथिनयुक्त (High Protein) आहार आणि मांसाहार उन्हाळ्यात कमी करावा, कारण तो पचायला जड असतो.

बाहेरील उघड्यावरचे पदार्थ किंवा शिळे अन्न खाणे टाळा.

अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते.

घराचे व्यवस्थापन

दुपारच्या वेळी खिडक्यांना पडदे लावून ठेवा. रात्री हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.

घरातील वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.

सामाजिक जबाबदारी

आपण आपल्यासोबतच मुक्या प्राण्यांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. घराबाहेर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत बांधा आणि त्यांना पुरेसे पाणी द्या.

लक्षात ठेवा: उन्हाळ्याची ही तीव्रता केवळ निसर्गाचा कोप नसून वाढते औद्योगिकीकरण आणि जंगलतोडीचा परिणाम आहे. स्वतःचे रक्षण करण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करणे, हेच उन्हाळ्यावरील कायमस्वरूपी उत्तर आहे.

आपत्कालीन संपर्क: तब्येत बिघडल्यास वेळ न घालवता जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा १०८ या हेल्पलाईनवर रुग्णवाहिकेसाठी कॉल करा.

सावध राहा, सुरक्षित राहा आणि उन्हाळ्याचा सामना धैर्याने करा!

प्रविण डोंगरदिवे

उपसंपादक

विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *