संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि. १२ :– ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.

आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती.

आशा भोसले यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *