वैद्यकीय उपचारांसाठी आरोग्य योजनांची एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. २० :– राज्यातील नागरिकांना आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबविते. राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांमधून अधिक प्रभावी व सुलभ मदत मिळावी यादृष्टीने एकीकृत व्यवस्थापन कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री शासकीय योजना मदत व समन्वय कक्ष’ संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीत ‘मित्रा’ (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सादरीकरण केले. बैठकीस शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव किरण वसाका, तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आदी विविध आरोग्य योजनांमधील लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. मागील वर्षभरात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ५ लाख २२ हजार, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत २ लाख १८ हजार रुग्णांचे अर्ज प्राप्त झाले असून विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली आहे.

आतापर्यंत विविध योजनांद्वारे सुमारे ३,२४३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आरोग्य योजनांमधील रुग्णालये व लाभार्थी यांचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी, तसेच केंद्र व राज्य योजनांचे एकत्रिकरण करून एकीकृत आरोग्य लाभार्थी व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे.

00000

किरण वाघ/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *