विषमुक्त अन्न तयार करणारा आणि प्रोत्साहन देणारा पोशिंदा….!

यशकथा

महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. याच धोरणातून प्रेरणा घेत, जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी राजेंद्र कांडेलकर यांनी विषमुक्त सेंद्रिय शेतीचा अवलंब करत स्वतःचा स्वतंत्र ब्रँड उभा केला आहे. पारंपरिक रासायनिक शेतीपासून दूर जाऊन पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि शाश्वत शेतीची दिशा त्यांनी स्वीकारली. शासनाच्या कृषी विभागाच्या सहाय्याने व मार्गदर्शनातून त्यांनी निंबोळीपासून जैविक कीटकनाशक तयार करत एक छोटासा उद्योग उभा केला, जो आज हजारो शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. सध्या काही तांत्रिक कारणासाठी लोकांना देण्याचे शक्य होत नाही. पण लवकरच पुन्हा जैविक उत्पादनांची गरज ओळखून, सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांच्या शेतात मात्र ते पूर्णपणे सेंद्रिय अन्न पिकवतात. यासाठी शासनाने त्यांचा वेळोवेळी गौरव केला आहे. ते सेंद्रिय शेतीचे जिल्ह्याचे दूत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामावर प्रकाश टाकणारा व सेंद्रिय शेती कशी करावी यावर प्रकाश टाकणारा हा लेख….!!

 

सेंद्रिय शेती ही केवळ पर्यावरणपूरक शेतीची दिशा नसून, भविष्यातील शाश्वत अन्नसुरक्षेचा मूलमंत्र आहे. याच मार्गावर गेल्या २५ वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत असलेले प्रगतशील शेतकरी राजेंद्र कांडेलकर यांनी सेंद्रिय शेतीला व्यावसायिक व व्यावहारिक दृष्टिकोन दिला आहे. त्यांनी रसायनमुक्त उत्पादनांचा प्रसार करताना पर्यावरणाच्या रक्षणालाही प्राधान्य दिले आहे.

सेंद्रिय शेतीकडे वळण्यामागील प्रेरणा

राजेंद्र कांडेलकर यांनी पारंपरिक रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीचा मार्ग २५ वर्षांपूर्वीच स्वीकारला. सुरुवातीला बाजारातून विकत घेतलेली कीटकनाशके व तणनाशके निकृष्ट दर्जाची असून पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी अनुभवलं. रासायनिक पदार्थांचा अतिरेक केवळ उत्पादनाचे नुकसान करत नव्हता, तर मातीची सुपीकता, जलस्रोत आणि पर्यावरणही बाधित होत होते. ही गंभीर बाब लक्षात घेत त्यांनी नैसर्गिक उपायांचा शोध घेतला.

प्रशिक्षण आणि जैविक उत्पादननिर्मितीची सुरुवात

श्री. कांडेलकर यांनी नैनीताल आणि पंजाब येथे जाऊन सेंद्रिय शेती व जैविक उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांनी ‘जय भोले नीम शक्ती अ‍ॅग्रो’ या नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी निंबोळीपासून जैविक कीटकनाशक – तेल, अर्क आणि पावडर तयार करण्यास सुरुवात केली. या उत्पादनांमध्ये कोणतेही रासायनिक घटक नसून त्याचा पिकांवर आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो.

निंबोळी उत्पादने: शाश्वत कीटकनाशकांचा पर्याय

श्री. कांडेलकर दरवर्षी सुमारे १०० टन निंबोळी खरेदी करतात आणि त्याचे साठवण करून उत्पादन तयार करतात. त्यांच्या निर्मित निंबोळी अर्कात ३५% निंबोळीचा अंश असतो, जो बाजारातील अन्य अर्कांपेक्षा अधिक प्रभावी ठरतो. हे अर्क ८० रुपये प्रति लिटर दराने विकले जातात. उत्पादन ५, ३५ आणि ५० लिटरच्या प्लास्टिक डब्यांमध्ये पॅक करून शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवले जाते.

उत्पादन प्रक्रिया

२०० लिटर क्षमतेच्या टाकीत निंबोळी, बुरशीनाशक व उपयुक्त सूक्ष्मजीव एकत्र करून २१ दिवस नैसर्गिक किण्वन प्रक्रिया राबवली जाते. तयार अर्क फवारणीसाठी वापरण्यात येतो. याशिवाय ते जैविक गांडूळ खत, कंपोस्ट खत, व सुकवलेली निंबोळी पावडर देखील तयार करतात, जी फळबागांमध्ये खतासोबत मिसळून वापरली जाते.

लघुउद्योगाचा विकास आणि रोजगारनिर्मिती

फक्त ४ ते ५ लाख रुपयांची सुरुवातीची गुंतवणूक करून त्यांनी एक लघुउद्योग सुरू केला. आज या यंत्रणेवर ७ ते ८ मजुरांचे कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाले आहेत. त्यांचे उत्पादन ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पिकांवर फवारणीसाठी वापरले जाते, जे पर्यावरणपूरक, कार्यक्षम व दीर्घकाळ टिकणारे आहे.

व्यापारीकरण आणि बाजारव्यवस्था

सुरुवातीला राजेंद्र कांडेलकर यांनी आपले उत्पादन स्थानिक पातळीवर विकण्याचा प्रयत्न केला, मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्थानिक कृषी कंपन्यांशी संपर्क साधला. त्यांची उत्पादन गुणवत्ता लक्षात घेऊन स्थानिक कंपन्यांनी त्यांना बाहेरील कंपन्यांच्या माध्यमातून विक्री करण्याचा सल्ला दिला. त्यांनी कृषी प्रदर्शनात भाग घेणे, पॅम्पलेट्स, पोस्टर लावणे आणि प्रत्यक्ष संवाद साधणे यावर भर दिला.

आज त्यांच्या उत्पादनांचा वापर नाशिक, अकोला, बुलढाणा ते मध्यप्रदेश या विस्तृत परिसरातील सुमारे दीड ते दोन लाख शेतकरी करत आहेत. केळी, द्राक्ष, संत्री, हळद अशा उच्चमूल्य पिकांमध्ये या जैविक उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

शासनाची मदत आणि गौरव

शेती व जैविक उत्पादने यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा कृषी पुरस्काराने सन्मान केला आहे. शासनातर्फे त्यांना विविध योजना, अनुदान व बाजार सल्ला यांचे सहकार्य देखील लाभले आहे.

जैविक शेतीचा प्रचार आणि प्रसार

राजेंद्र कांडेलकर यांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, ते इतर शेतकऱ्यांनाही जैविक शेतीसाठी प्रेरित करतात. ते स्वतः केळी व मका यांसारख्या पिकांमध्ये जैविक पद्धतीने शेती करत असून कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतात. या माध्यमातून त्यांना शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 एक प्रेरणादायी यशोगाथा

आजच्या काळात जेव्हा रासायनिक शेतीमुळे आरोग्य व पर्यावरणाचे संकट निर्माण झाले आहे, तेव्हा राजेंद्र कांडेलकर यांचा सेंद्रिय शेतीचा प्रवास ही एक आशेची किरणं देणारी यशोगाथा आहे. त्यांनी शाश्वत शेती, पर्यावरण रक्षण आणि कृषी क्षेत्रातील उद्योजकता यांचा सुरेख संगम साधला आहे.

अशा शेतकऱ्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने व्यापक स्तरावर करावा, जेणेकरून इतर शेतकरीही सेंद्रिय शेतीच्या दिशेने प्रेरित होतील आणि शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

– युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *