विल्सन महाविद्यालय येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा टप्पा क्र.१ १५ मे २०२६ पर्यंत सुरु राहणार असून १४ मार्च २०२६ रोजी विल्सन महाविद्यालय, गिरगांव चौपाटी समोर, मुंबई येथील महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी १०.०० ते दुपारी २:०० पर्यंत सदर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सर्वसामान्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने आणि एकाच छताखाली सोडवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. तरी नागरिकांनी या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सामान्य नागरिकांना तसेच शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थांना शासकीय कार्यालयांत वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात खालील सेवांवर विशेष भर दिला जाणार आहे:

दाखले वाटपः जात, उत्पन्न, नॉन-क्रिमिलेअर आणि अधिवास (डोमिसाईल) दाखल्यांचे त्वरित वाटप.

सातबारा व फेरफारः सातबारा उताऱ्यातील त्रुटी दुरुस्त करणे आणि प्रलंबित फेरफार नोंदी निकाली काढणे.

शिधापत्रिका : नवीन शिधापत्रिका, नावे कमी करणे किंवा वाढवणे यासारखी कामे.

शासकीय योजनाः संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासारख्या लोककल्याणकारी योजनांचे अर्ज स्वीकारणे व मंजुरी देणे.

अतिक्रमण व जमीन मोजणीः जमिनीशी संबंधित वादांचे निवारण आणि मोजणी अर्जाबाबत मार्गदर्शन.

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. महसूल विभागाचे सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून तक्रारीचे निवारण करणार आहेत.

“शासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आमचे उद्दिष्ट असून, नागरिकांनी या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,” असे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *