विधानसभा लक्षवेधी

पुलगाव येथील ४५० घरांना मालकी हक्क देणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई,दि.२५: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील हिंगणघाट फैल परिसरातील जुना सर्व्हे नंबर ३६९  मधील सुमारे ४५० घरांना मालकी हक्क देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

विधानसभेत सदस्य राजेश बकाने यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, संबंधित भागात या ठिकाणी ४५० पेक्षा अधिक घरे अस्तित्वात आहेत. या सर्व घरांना त्यांच्या मालकीचा हक्क मिळणे आवश्यक आहे. या घरमालकांना खासगी सनद, प्रॉपर्टी कार्ड तसेच त्यांच्या घरांच्या नोंदी अभिलेखात नोंदवून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंत्रीमंडळात निर्णय घेतला आहे. दि.1 जानेवारी 2011 पूर्वी बांधण्यात आलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी राज्य शासन महत्त्वाचा निर्णय घेत आहे. नगरपालिकांमध्ये संबंधित समित्या, महानगरपालिकांमध्ये जिल्हाधिकारी समिती आणि ग्रामीण भागात तहसीलदार समितीला अधिकार देऊन अशा घरांचे प्रॉपर्टी कार्ड नियमित करण्यात येणार आहे. पूर्वी झालेल्या चुकीच्या नोंदी रद्द करून सर्व अभिलेख दुरुस्त करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २५: गृहनिर्माण धोरणानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये 20 टक्के घरे ही ईडब्ल्यूएस व एलआयजी घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील याबाबतच्या प्रकारणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असे उत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले.

विधानसभेत सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, नाशिक येथील गृहनिर्माण क्षेत्रातील या प्रकारात बनावट नकाशे, बनावट मोजणी, तसेच बनावट दस्तऐवज तयार करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही विकासकांनी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने भूखंडांचे छोटे-छोटे तुकडे करून या नियमाला बगल देत गरीबांना घरांपासून वंचित ठेवले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या तपासात एकूण काही प्रकरणे उघडकीस आली आहे. काही ठिकाणी एकाच दिवशी भूखंडांचे तुकडे करून मंजुरी घेण्यात आली, ज्यामुळे हा प्रकार संगनमताने केल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणात नाशिक येथील विकासकांसह संबंधित शासकीय अधिकारी, महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून ती महिनाभरात अहवाल सादर करेल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, दि. २५: दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याबाबत राज्य शासन कटिबद्ध असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली.

विधानसभेत सदस्य अमिन पटेल यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, कामाठीपुरा परिसरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि उपकरप्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने १२ जानेवारी २०२३ रोजी घेतला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार कुटुंबांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे उपलब्ध होणार आहेत. नगरविकास विभागाने ९ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार या प्रकल्पासाठी विशेष नियोजन प्राधिकरण घोषित केले आहे. तसेच, २२ जून २०२५ रोजी या संदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र विकासकांची नियुक्तीही निश्चित करण्यात आली आहे.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, तरी या आठवड्यात कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल. याशिवाय, हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या परवानगीने याला ‘व्हायटल प्रोजेक्ट’चा दर्जा देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, उमरखाडी पुनर्वसन प्रकल्पा एकूण ८१ इमारतींच्या पुनर्विकासासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३६ इमारतींचे काम लवकरच सुरू केले जाईल. केंद्राचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर उमरखाडी परिसरातील १२ इमारतींच्या संरक्षक दुरुस्तीसाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *