मौजा वाठोडा येथील प्रधानमंत्री आवास योजना वसाहतीतील घरकुल प्रकल्पांची कामे दर्जानुसार पूर्ण; सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १०: नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाद्वारे मौजा वाठोडा परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे दर्जानुसार पूर्ण झाली असून त्याठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य विकास ठाकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले की, मौजा वाठोडा येथे २६४ आणि मौजा तरोडी (खुर्द) येथे ३,३१६ अशा एकूण ३,५८० घरकुलांची कामे १३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात आली असून, मंजूर विकास आराखड्यानुसार सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वाठोडा आणि तरोडी येथील प्रकल्पांमध्ये गाळेधारकांच्या नोंदणीकृत सहकारी संस्थांमार्फत मूलभूत सुविधा व देखभालीची जबाबदारी पार पाडली जाते.
योजनेतील सर्व कामे निविदेतील अटी-शर्ती आणि निर्धारित मानकांनुसार करण्यात आली असून, त्यांचे त्रयस्थ पक्ष तांत्रिक निरीक्षण व्हीएनआयटी नागपूर या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. संस्थेच्या अहवालानुसार सर्व कामे गुणवत्तापूर्ण व नियमांनुसार पूर्ण झाल्याचे प्रमाणित करण्यात आले असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
००००
वंदना थोरात/विसंअ
महामार्गालगत स्थानिक वृक्षांचेच रोपण – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
वृक्षसंवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्राधान्य
मुंबई, दि. १०: महामार्गालगत करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणामध्ये स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचेच रोपण करण्यात येईल. तसेच, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम पुढाकाराने करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
थेऊर–लोणीकंद येथील अष्टविनायक महामार्ग रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिपूरक वृक्षारोपणातील कथित उल्लंघनाबाबत सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भोसले बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले की, राज्यातील महामार्गांलगत नियमितपणे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची कामे करण्यात येतील. या वृक्षारोपणामध्ये स्थानिक परिसरातील वृक्षप्रजातींसह फळझाडे आणि फुलझाडांना प्राधान्य दिले जाईल. विदेशी किंवा केवळ शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या वृक्षांची लागवड केली जाणार नाही. तसेच वृक्षांचे जिओ-टॅगिंग करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभागातील पीएन-३३ अष्टविनायक मार्ग सुधारणा प्रकल्पांतर्गत भाग-३ मधील कर्डे–रांजणगाव, कर्डे–न्हावरा आणि लोणीकंद–थेऊर फाटा या मार्गांवर आतापर्यंत सुमारे २,००० झाडांची लागवड करण्यात आल्याची माहितीही मंत्री भोसले यांनी दिली.
००००
श्रद्धा मेश्राम/विसंअ
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अतिरिक्त निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा सुरू – मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. १०: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, वाढत्या महागाईचा विचार करून शिष्यवृत्ती वाढविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अबु आझमी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवाळ बोलत होते. या चर्चेत सदस्य अमीन पटेल, अमित देशमुख यांनी सहभाग घेतला.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, २०२५-२६ मध्ये शिष्यवृत्तीसाठी सुमारे २०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र वित्त विभागाकडून ६० कोटी रुपये उपलब्ध झाले. उर्वरित निधीसाठी पावसाळी, हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे ९० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तथापि, तो मंजूर झाला नाही. त्यामुळे उपलब्ध निधीतूनच शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, २०२६-२७ या आर्थिक वर्षात ८०.७६ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी ४८.४६ कोटी रुपये २५ जून रोजी वितरित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
अल्पसंख्याक समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याबाबत नियोजन करण्यात येईल, असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
००००
वंदना थोरात/विसंअ
तीर्थपुरीतील बनावट तूप प्रकरणात परवाना कायमचा रद्द होणार – मंत्री नरहरी झिरवाळ
लॅब अहवालानंतर कायदेशीर कारवाई करणार
मुंबई, दि. १०: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कथित बनावट तूप निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापनेचा परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.
यासंदर्भात सदस्य प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तीर्थपुरी येथील मे. मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेवर छापा टाकला. तपासणीदरम्यान तुपामध्ये खाद्यतेल व तुपाचा फ्लेवर असलेले इसेन्स मिसळून बनावट तूप तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. यावेळी एकूण आठ अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
कारवाईदरम्यान पॅकबंद स्वरूपातील १,१२१.८ लिटर तूप, खुल्या स्वरूपातील ६६३.८ लिटर तूप आणि ११८ लिटर रिफाइंड सोयाबीन तेल, असा एकूण १३.०४ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
सध्या सर्व नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि संबंधित नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींमुळे संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करून आस्थापना सील करण्यात आली असून, पुढील प्रक्रियेनंतर परवाना कायमचा रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
००००
श्रद्धा मेश्राम/विसंअ