नंदुरबारच्या तळोदे शहरातील अनुसूचित जमातींच्या घरांचे कायदेशीर संरक्षण करण्यासाठी शासन सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या घरांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी शासनाने गंभीर विचार सुरू केला आहे. महाराष्ट्र कुल व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 18 आणि 19 नुसार नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा शहरातील गावठाणमधील घरे अनुसूचित जमातीच्या कुटुंबांची असून, त्या जमिनीवर अनेक वर्षांपासून ते वास्तव्यास आहेत. शासन या जमिनींच्या कायदेशीर नियमितीकरणासाठी सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सुचनेद्वारे प्रश्न मांडला, या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते.
मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, यासंदर्भात उच्च न्यायालयाने काही आदेश पारित करून जहागीरदारांचे हक्क मान्य केले आहेत. तथापि, या आदेशाविरोधात रिव्ह्यू पिटिशन किंवा सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमति याचिका (SLP) दाखल करता येऊ शकेल का, याचा शासन विचार करत आहे.
हे अतिक्रमण जवळपास ७५ वर्षांपूर्वी झाले असल्याने महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियमनुसार अशा अतिक्रमणांचे कायदेशीर रूपांतर करता येईल का, याचाही गांभीर्याने अभ्यास केला जात आहे. आदिवासी कुटुंबांची घरे नियमित करून त्यांचे घर सुरक्षित करणे ही तातडीची गरज असून लवकरच यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. कायदेशीर, प्रशासकीय आणि न्यायालयीन मार्गांचा उपयोग करून या नागरिकांचे संरक्षण केले जाईल, असे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
000
संजय ओरके/विसंअ/
समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यास उपाय योजना करणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
मुंबई दि. ९ :- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस (ITMS) प्रणालीच्या माध्यमातून महामार्गावरील वेगमर्यादा, लेन शिस्त आणि इतर १७ प्रकारच्या नियमभंगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक उपाय योजना केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी समृद्धी महामार्गावर होणारे अपघात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य विठ्ठल लंघे यांनीही सहभाग घेतला.
या लक्षवेधीच्या उत्तरात मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत व्हावी यासाठी महामार्गावर अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद २१ वाहने (या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी फायर फायटिंग, हायड्रॉलिक जॅक, कटरर्स, ऑक्सिजन सिलेंडर सिस्टीम इत्यादी प्रथमोपचार सुविधांची सोय करण्यात आली आहे), २१ रुग्णवाहिका, १६ गस्त वाहने, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र १६ आणि ३० टन क्षमतेच्या १६ क्रेन यासह महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १७२ सुरक्षा रक्षक अशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच २१ रुग्णवाहिका १०८ (आपत्कालीन वैद्यकीय सेवा महाराष्ट्र राज्य) अशी जोडलेल्या आहेत.
याव्यतिरिक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवेची रुग्णवाहिका (१०८) अहिल्यानगर जिल्ह्यात ४०, अमरावती ३१, छत्रपती संभाजीनगर ३१, बुलढाणा २३, जालना १५, नागपूर ४०, नाशिक ४६, ठाणे ३९, वर्धा ११, वाशिम ११ अशा २८७ रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध असतात, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य श्री. दाते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित अपघात घटनेबाबत मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, या अपघाताची माहिती कंट्रोल रूमला मिळताच तत्काळ मदतीसाठी वाहन पाठविण्यात आले. सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांस आवश्यक उपचार मिळाले नाहीत या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच सदस्य विठ्ठल लंघे यांच्या मतदारसंघातील रुग्णालयाबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल.
०००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/