महाराष्ट्रात माता-बाल मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी; उपाययोजना अधिक प्रभावी करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
नागपूर, दि. १४ : महाराष्ट्राचा माता मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले,केवळ घट झाली म्हणून समाधान मानणे योग्य नसून, माता-बाल मृत्यू पूर्णपणे रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या एसओपी, जननी सुरक्षा योजना, एनआरसी व एसएनसीयू योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
२०१७-१९ या कालावधीत देशाचा माता मृत्यूदर प्रति लाख जन्मांमागे १०३ असताना महाराष्ट्राचा दर ३८ होता. तर २०२०-२२ मध्ये देशाचा दर ८८ आणि महाराष्ट्राचा ३६ असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
०००००००
राजू धोत्रे/विसंअ/
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील योजनांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात येणार; दोषींवर कठोर कारवाई – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
नागपूर, दि. १४ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री फुंडकर म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक सहाय्य तसेच अत्यावश्यक व गृह उपयोगी संच देण्यात येणाऱ्या योजनांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून यासंदर्भात स्पेशल ड्राईव्ह सुरू करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तपासणी करून अनियमितता आढळलेल्या प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असल्याने बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याची शक्यता तपासली जात असून दोषी अधिकारी किंवा व्यक्ती आढळल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मंत्री फुंडकर यांनी दिली.
००००००००
राजू धोत्रे/विसंअ/
तारापूर एमआयडीसीतील वायू गळती प्रकरणी कारखाना बंद; धोकादायक कारखान्यांची विशेष तपासणी मोहीम- कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
नागपूर, दि. १४ : तारापूर एमआयडीसीतील मेडली केमिकल कारखान्यात वायू गळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संबंधित कारखान्यावर गुन्हे दाखल करून तो बंद करण्यात आला आहे. मानवी चुकीमुळे व्हॉल्व्ह न उघडल्याने हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधान परिषद सांगितले.
सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्यास कामगार मंत्री उत्तर देताना बोलत होते.
कामगार मंत्री श्री फुंडकर म्हणाले,मृत कामगारांच्या वारसांना नुकसानभरपाई व सानुग्रह अनुदान देण्यात आले असून उर्वरित प्रकरणांत विमा योजनेंतर्गत पेन्शनसाठी दावा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या औद्योगिक अपघातांच्या पार्श्वभूमीवर तारापूर–पालघर परिसरातील धोकादायक कारखान्यांची येत्या महिन्यात विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल, अशी माहिती कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी विधानपरिषदेत दिली.
०००००००००
राजू धोत्रे/विसंअ/