विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्ये आत्मसात करावीत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १९: शिक्षण हे समाज आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असून ‘शिक्षित बना, ज्ञान मिळवा आणि सक्षम व्हा’  हा श्री नारायण गुरु यांचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्येही आत्मसात करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चेंबूर येथील श्री नारायण गुरु हायस्कूलचे सुवर्णमहोत्सवी वर्ष तसेच श्री नारायण मंदिर समितीच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री नारायण गुरु महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

श्री नारायण गुरु यांच्या विचारांना अभिवादन करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या ६२ वर्षात श्री नारायण मंदिर समितीने शिक्षण व सामाजिक सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्रभर शाळा, महाविद्यालये तसेच सांस्कृतिक व आध्यात्मिक केंद्रांच्या माध्यमातून संस्थेने शैक्षणिक जाळे विस्तारले आहे. आज उद्घाटन झालेल्या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमधील आधुनिक स्मार्ट क्लासरूम, संगणक लॅब, विज्ञान प्रयोगशाळा आणि कौशल्य विकास केंद्रांमुळे विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. संस्थेच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिली. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीबद्दल श्री नारायण मंदिर समिती, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास माजी खासदार राहुल शेवाळे, संस्थेचे अध्यक्ष श्री. एम. आय. दामोदरन, चेअरमन श्री. एन. मोहनदास आणि सरचिटणीस श्री. ओ. के. प्रसाद, एस. चंद्राबाबू, प्राचार्या श्रीमती लेजा श्रीरत्नन, शिक्षक, विद्यार्थी, पालक, श्री नारायण मंदिर समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *