विकासकामांसह नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे – मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. ३१ जुलै (जिमाका वृत्तसेवा) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रस्ते, पाणीपुरवठा, गॅस पाइपलाइन, फायबर केबल, ड्रेनेज तसेच विविध युटिलिटीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक असले तरी त्यादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड होणार नाही, याची संबंधित विभागांनी  विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन  तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

महानगरपालिका कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर आमदार प्रा.देवयानी फरांदे, आमदार सिमा हिरे, आमदार ॲ .राहुल ढिकले, स्थायी समितीचे सदस्य मच्छिंद्र सानप, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, स्मिता झगडे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की, नाशिक शहरात विविध विभागांची विकासकामे एकाचवेळी सुरू असल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय होणे स्वाभाविक आहे. काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या असून त्या अत्यंत गंभीर आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रत्येक कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. काम सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार असल्याने ही कामे वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

काम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, योग्य दिशादर्शक फलक लावणे, पुरेशा प्रमाणात बॅरिकेड्स उभारणे, रात्रीच्या वेळी परावर्तित (रिफ्लेक्टर) सूचना फलक लावणे तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले. सुरक्षा संदर्भात तक्रारी असलेल्या भागात संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करून कामाच्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करावी. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील, त्या तातडीने दूर करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

रस्ते खोदकामामुळे नागरिकांना नेमका कोणता मार्ग वापरायचा, याबाबत स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचे स्पष्ट मार्गदर्शन करणारे फलक लावावेत. नागरिकांची दिशाभूल होणार नाही आणि अपघाताची शक्यता कमी होईल, यासाठी वाहतूक पोलिस, महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील काही रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन दिवसांत ती पूर्ण करून संबंधित मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील.  अंबड व सातपूर एमआयडीच्या भागातील रस्ता दुरूस्तीची कामे येत्या दोन दिवसात तातडीने पूर्ण करावीत. तसेच कामे दर्जात्मक होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री महाजन यांनी यावेळी दिल्या.

नागरिकांनीही काम सुरू असलेल्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी, सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करताना मंत्री महाजन म्हणाले की, विकासकामे आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींना समान महत्त्व देत प्रशासन काम करत असून सुरक्षित, सक्षम आणि कुंभमेळ्यासाठी सज्ज नाशिक उभारण्यावर भर दिला जात असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी शहरात कुंभमेळा विषयक सुरू असलेल्या कामे व केलेल्य नियोजनाबाबत माहिती दिली.

मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली कोतकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट, शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन.

जलसंपदा तथा सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अंबड परिसरातील दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या  दिवंगत निलेश प्रल्हाद कोतकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करत शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी महापौर हिमगौरी आडके आमदार सिमा हिरे, स्थायी समितीचे सदस्य मच्छिंद्र सानप नगररसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक सुवर्णा मटाले व अधिकारी उपस्थित होते.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *