जिल्हा नियोजन 2026-27 अंतर्गत 623 कोटींचा आराखडा

बीड, दि. ३१ : बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधीसह प्रशासन पातळीवरील प्रयत्न कुठेही कमी पडू दिले जाणार नाहीत अशी ग्वाही देतानाच दिवंगत अजितदादांच्या स्वप्नातलं बीड आणि त्याचा विकास पूर्ण करण्याचे अभिवचन मी देते, असे राज्याच्या उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर दिवंगत अजित दादांचे बीड जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी मला साथ द्यावी, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची सभा पार पडली यामध्ये 2026-27 या वर्षासाठी 623 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन सभागृहात ही सभा झाली. यावेळी पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, सर्वश्री आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, संदीप क्षिरसागर, सतीश चव्हाण, विजयसिंह पंडीत, सुरेश धस, विक्रम काळे, नमिता मुंदडा, बसवराज पाटील, सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा बनवताना दादांनी दिलेल्या सूचना पुढेही सुरू ठेवाव्यात असे निर्देश देण्यात आले. याबाबतचे सविस्तर सादरीकरण या सभेत झाले.या सूचनांप्रमाणे कोणतेही काम 15 लाख रूपयांपेक्षा कमी असता कामा नये. एकाच कामाचे तुकडे करून स्वतंत्र अंदाजपत्रके दिल्यास त्याला मान्यता प्रदान केली जाणार नाही. ही एक महत्त्वाची सूचना आहे.

जिल्हा नियोजनात जिल्हा परिषद आणि इतर यंत्रणांना जो निधी दिला जातो त्याचा योग्य प्रकारे विनियोग करून लोकांच्या विकासासाठी प्रयत्न असावेत. असेही सांगण्यात आले आहे. विकासकामात पारदर्शकता व आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. तसेच नियोजन करताना ही कामे प्रशासनाची गरज आणि लोकप्रतिनिधींची मागणी याचा समन्वय राखणारी असावी, अशा सूचना श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी या बैठकीत दिल्या. आजच्या सभेत सुरुवातीला पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती 2026 स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला लोगो आणि शुभंकरचे अनावरण करण्यात आले. तसेच त्यांनी स्पर्धेच्या पुर्व तयारीचा आढावाही यावेळी घेतला.

श्रीमती सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बीड जिल्ह्याला वारकऱ्यांचा वारसा आहे. जिल्हा बीडच्या विकासासाठी दादांनी केलेले नियोजन सर्व लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विचारातून, भुमिकेतून दिसून आले आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदार संघात आवश्यक कामांसाठी केलेल्या निधी तरतूदीचा जिल्हाधिकारी यांनी नियोजनात समावेश करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच आमदार धनंजय मुंडे, सुरेश धस यांच्यासह व इतर लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या व ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकप्रतिनिधींच्या इतर सर्व सुचनांवर संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह बैठक घेऊन प्रश्न सोडविले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर आपले घर, समाज आणि आपल्या जिल्ह्याचा अभिमान राखला जाईल यासाठी सर्वांनी दक्षता घेण्याचे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार धनंजय मुंडे यांनी मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठीचा निधी, ग्रामीण विकास निधी, रस्ते विकास, परळी तालूक्यातील धर्मापूरी येथील पुरातन मंदिर विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करण्याची मागणी केली. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची काम करण्याची पध्दत दिवंगत अजित दादांप्रमाणेच आहे. बीड ऊसतोड कामगार कष्टकरी, वारकरी लोकांचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या सर्व लोकप्रतिनिधींनी येथील शाळा, स्मशानभूमी रस्ते, यासारख्या मुलभूत, पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. लोकप्रतिनिधी सोबतच प्रशासनानेही जनताभिमूख राहून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करावा, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्ह्यातील रस्‍त्यांच्या जोडणी, दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देणे, पाणी पुरवठा योजनेच्या कामात बोगस रक्कम उचलण्यावर सबंधितांवर कारवाईची मागणी केली. एमएसीबी लाईनमुळे मृत्यू झालेल्यांना मदत देणे, शेतकऱ्यांना पीक कर्जात सवलतीच्या दरात 3 लाखांवरुन 7 लाखांपर्यंत मर्यादा वाढविण्याची विनंती केली. त्याचबरोबर तलाठी, ग्रामसेवकांनी गावात राहणे, ऊसतोड कामगारांच्या समस्या घरकुल लाभार्थी यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. आमदार विक्रम काळे यांनी, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यपध्दतीला खंबीर पाठिंबा असल्याचे सांगत 435 गावातील प्रत्येक मतदार संघात स्मशानभूमी झाली पाहिजे त्यासाठी जागेची तरतूद करावी, अशी सूचना केली.

आमदार नमिता मुंदडा, शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी भरणे सुलभीकरण, डिपीडिसीमधून सर्व रुग्णालयासाठी औषध खरेदीसाठी आधिकची मागणी केली. तसेच मागील वर्षीचा थकित निधी मिळावा मुलींना कॅन्सर रोखण्यासाठी देण्यात येणाऱ्या HPV लसींबाबत जाणीव जागृती करण्यात यावी, अशी सूचना मांडली.आमदार विजयसिंह पंडित यांनी मागील वर्षीच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तरतूद करणे तसेच संबंधित विभागात हातपंप दुरुस्ती होण्यासाठी रिक्त जागा तातडीने भरण्याची सूचना केली.आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांवरील पुलांची दयनीय अवस्था, धारूरसाठी सीसीटीव्ही उपलब्धतेसाठी निधी, जिल्ह्यात विविध उद्योग आणण्यासाठी तसेच सीएसआर फंड मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्ह्यात मराठा भवन उभारणे तसेच मुलींसाठी वसतीगृह उभारण्यासाठी तरतुद करण्याची सूचना केली. आमदार सुरेश धस जिल्ह्यातील दुध उत्पादक, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता कुकुटपालन निधी यासारख्या विविध विशेष घटक योजना अंतर्गत निधीच्या प्रस्तावांकडे लक्ष देण्याची सूचना केली.

ठळक तरतुदी

पशुसंवर्धन अंतर्गत कृत्रिम रेतनकेंद्र इमारत बांधकाम 5.27 कोटीची मान्यता

पशुपैदास प्रक्षेत्र साकूड येथे पाणीपुरवठा योजना 2.99 कोटी

18 पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम व दुरूस्ती 4.89 कोटी

जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन जिल्हा परिषद साठी विशेष निधी

2025-26 मध्ये वन विभागामार्फत 475.4 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड झाली. येत्या काळात आणखी 263.30 हेक्टर वर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

हरित बीड वृक्ष लागवड अंतर्गत यंदा 65 लाख 49 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

ग्रामपंचायत जनसुविधेसाठी 37.53 कोटी विशेष अनुदान यात प्रामुख्याने 91 ठिकाणी स्मशानभूमी शेड बांधकाम आणि ग्रामपंचायत इमारत बांधकाम

ऊर्जा विकास अंतर्गत विविध 61 कार्यालयात अपारंपारिक ऊर्जा साधन विकास अंतर्गत 12 कोटी मंजूर

बीड जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकाम 2 कोटीची मान्यता एकूण आराखडा 4.95 कोटी रूपयांचा

कंकालेश्वर मंदिर विकासासाठी 11.21 कोटींची तरतूद

—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *