वाशिम वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘संत सेवालाल महाराज’ नामकरण

मुंबई, दि. १३: संत सेवालाल महाराज जयंतीच्या औचित्याने राज्य शासनाने वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण ‘संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम’ असे करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १३ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील हे महाविद्यालय १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे असून त्यास ४३० खाटांचे संलग्नित रुग्णालय आहे. वाशिम जिल्हा तसेच आसपासच्या ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना दुय्यम व तृतीयस्तरीय आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतानाच आधुनिक आरोग्यसेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे कार्य येथे सुरू आहे.

महाविद्यालयाच्या नामांतराबाबत लोकप्रतिनिधीकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि महान समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सेवालाल महाराजांनी सामाजिक समता, नैतिक जीवन, व्यसनमुक्ती, परिश्रम व स्वाभिमानाचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय विशेष औचित्यपूर्ण मानला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या नामांतरास मान्यता दिली. नामांतरानंतर आवश्यक बदल संकेतस्थळे, अभिलेखे व अधिकृत नोंदींमध्ये करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.

या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाला सामाजिक मूल्यांची जोड मिळणार असून संतांच्या विचारांचा प्रसार नव्या पिढीपर्यंत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

०००

शासन निर्णय

CR 357 25 Washim GR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *