लोकाभिमुख कारभारातूनच विकासाला गती मिळते : राज्यमंत्री योगेश कदम

बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : भव्य-दिव्य इमारतीपेक्षा त्या इमारतीतून चालणारा कारभार किती लोकहिताचा, पारदर्शक आणि जनतेसाठी उपयुक्त आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. शासनाच्या योजना आणि सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्यासच विकासाचा खरा अर्थ साध्य होतो, असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी केले.

मेहकर तालुक्यातील सुमारे ४१ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांमध्ये अद्ययावत अभ्यासिका, तलाठी व महसूल कार्यालय तसेच पंचायत समिती इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण आज राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, आमदार सिद्धार्थ खरात, मेहकर नगरपालिकेचे अध्यक्ष किशोर गारोळे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, माजी आमदार संजय रायमुलकर, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यमंत्री कदम म्हणाले की, या विकासकामांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आधुनिक आणि सुसज्ज इमारतींमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळतील. मात्र केवळ इमारती उभारणे पुरेसे नसून अधिकाऱ्यांनी कार्यालयापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना आणि लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, शासन आणि प्रशासन हे नागरिकांपर्यंत विकास पोहोचविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे सर्व विभागांनी कार्यक्षम, संवेदनशील आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. ग्रामविकास विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्रे तसेच जिल्हास्तरावर ‘उमेद मॉल’ सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

शासनाकडे अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. मात्र केवळ निधी खर्च झाला किंवा लाभांचे वितरण झाले, एवढेच महत्त्वाचे नसून त्या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात किती सकारात्मक बदल झाला आणि त्यांना किती समाधान मिळाले, हे अधिक महत्त्वाचे आहे. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच प्रशासनाच्या कामाची खरी पावती आहे, असे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शाळा, शासकीय कार्यालये आणि विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन करत त्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या पंचायत समिती इमारती, तलाठी भवन आणि महसूल कार्यालयामुळे प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि राज्य शासन या ग्रामीण विकासाच्या प्रमुख संस्था असून त्यांनी लोकाभिमुख पद्धतीने कार्य करणे आवश्यक आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे शासकीय सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेशी संवाद वाढवून योजनांची माहिती व लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचवावेत.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल, कृषी आणि इतर विभागांनी समन्वयाने काम करून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना द्यावी. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दौऱ्यादरम्यान राज्यमंत्री योगेश कदम यांनी मेहकर पोलीस ठाण्याच्या नव्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करून कामाचा दर्जा कायम राखत बांधकाम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

00000

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *