‘राज्य नाट्य स्पर्धे’च्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ४: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी 8 जून ते 18 जून 2026 या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ऑनलाईन पद्धतीने ‘तिकीटालय’ ॲपवरुन या स्पर्धेतील नाटकाची तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

राज्यातील दर्जेदार व्यावसायिक नाट्यप्रयोगांचे सादरीकरण या अंतिम फेरीत होणार असून रसिक प्रेक्षकांना उत्कृष्ट नाट्यकृतींचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध नामांकित नाट्यसंस्थांचे आणि निर्मात्यांचे नाट्यप्रयोग होणार आहेत. 8 जून रोजी ‘ठरलंय FOREVER’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार होईल. त्यानंतर ‘सविता दामोदर परांजपे’, ‘भूमिका’, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’, ‘कुटुंब किरैतन’, ‘एकदा असंच पाहावं करून’, ‘करुणाष्टके- उंबरठ्या पलीकडची गोष्ट’, ‘मीमी’ आणि ‘शंकर जयकिशन’ हे नाट्यप्रयोग सादर करण्यात येतील. या सर्व नाट्यकृतींमधून सामाजिक, कौटुंबिक, विनोदी; तसेच समकालीन विषयांचे विविध पैलू रंगभूमीवर उलगडले जाणार आहेत.

मंत्री ॲड. शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील व्यावसायिक रंगभूमीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट नाट्यनिर्मितींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्यकलेचा दर्जा उंचावणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

स्पर्धेच्या सर्व प्रयोगांसाठी तिकीट दर 50 आणि 30 रूपये निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रयोगाच्या दोन दिवस आधी सकाळी 10.00 वाजल्यापासून ‘तिकीटालय’ या ॲपवर तिकीट विक्री सुरु होईल. याचा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *