मुंबई, दि. ११ : राज्यतील कामगारांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी राज्य कामगार विमा योजनेचा आढावा घेतला.
बैठकीत योजनेअंतर्गत नोंदणीकृत सदस्यांची संख्या, सदस्यांकडून प्राप्त होणारी वर्गणी, विमा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले दवाखाने, नवीन दवाखाने सुरू करण्याबाबतची स्थिती तसेच राज्यातील कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या खाटांची माहिती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी कामगारांना आरोग्य सुविधा वेळेत आणि गुणवत्तापूर्ण मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून, विमा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रुग्णालये व दवाखान्यांची कार्यक्षमता वाढविण्याचे निर्देश दिले. औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवीन दवाखाने सुरू करण्याच्या प्रस्तावांवरही यावेळी चर्चा झाली.
कामगार विमा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या रुग्णखाटा, उपचार सुविधा, वैद्यकीय मनुष्यबळ आणि औषध उपलब्धता याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीस संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००
राजू धोत्रे/विसंअ